इंधन दरवाढी विरोधात युवक कॉंग्रेसचे हटके आंदोलन

पेट्रोल पंपावर लावले नवीन बॅनर
पुणे: महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या वतीने मंगळवारी इंधन दरवाढी विरोधात हटके आंदोलन करण्यात आले. देशभरातील पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बॅनर लावण्यात आले आहेत. युवक कॉंग्रेसच्या वतीने राज्यातील काही ठिकाणच्या पेट्रोल पंपावरील बॅनर बदलून इंधन दरवाढीवर भाष्य करणारे नवीन बॅनर लावण्यात आले आहे.
याबाबत युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ट्वीट केले आहे. “केंद्र सरकारच्या तोंडा बरोबर डोळे आणि कानावर सुद्धा मास्क आहे. पेट्रोल, डीझेल, गॅसचे भाव गगनाला भिडले असतांना केंद्र सरकार यावर मुग गिळून का शांत बसले? याला जाब विचारण्यासाठी युवक कॉंग्रेसच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन केले आहे” असे ट्वीट त्यांनी केले आहे.
मै न कूच बोलुंगा, न कूच देखुंगा, न कूच सुनुंगा अशा प्रकारच्या ओळी त्या पंतप्रधान मोदी यांच्या बॅनर वर लिहण्यात आल्या आहेत. याच प्रकारचे बॅनर लोणावळा, जयसिंगपूर येथे लावण्यात आले होते.