युवक काँग्रेसच्या अध्यक्षांची मुख्यमंत्र्यांना विनंती
मुंबई: एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. राज्यभरातील लाखो युवक-युवती अधिकारी बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून प्रत्येक वर्षी एमपीएससीच्या परीक्षा देत असतात.
मार्च महिन्यात होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आलीये एमपीएससीने याबाबत घोषणा केलीये. १४ मार्च रोजी ही परीक्षा होणार होती. दरम्यान या परीक्षेच्या तारखा गेल्या दीड वर्षात पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पुण्यामध्ये तर विद्यार्थ्यांचा उद्रेक पाहायला मिळतोय. परीक्षा पुढे ढकलल्याने शास्त्रीरोडवर रास्तारोको करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाल्यानं विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.यावेळी MPSC अभ्यासिकेतील २ हजार मुलं रास्तारोकोत सहभागी झाल्याचा अंदाज आहे. विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत आयोगाचा निषेध व्यक्त केलाय.या सगळ्या घटनेवर अनेक नेतेमंडळींनी आपलं मत व्यक्त केलंय. दरम्यान महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी मुख्यमंत्र्यांना याचसंदर्भातलं विनंती पत्रं लिहिलं आहे. ‘कोरोनाच्या संकटामुळे अनेक वेळा राज्यसेवेची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली गेली. आता नवीन वेळापत्रकानुसार फक्त ३ दिवसांवर आलेली परीक्षा पुढे ढकलण्याचा महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाने घेतलेला निर्णय अतिशय संवेदनशील आहे. आर्थिक कुचंबणा,वाढते वय,कौटुंबिक अपेक्षा,सामाजिक तणाव अशा अनेक अडचणींना सामोरं जात हे विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत असतात.’असं या पत्रात म्हटलंय. तसंच ‘ सगळं काही सुरळीत असताना ही परीक्षा पुढे ढकलून काहीही साध्य होणार नाही त्यामुळे सरकारने यावर फेरविचार करून तातडीने योग्य तो निर्णय घ्यावा’ अशी विनंती महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केलीये.