तुमचे साखर कारखाने माणसासाठी हवेतला ऑक्सिजन पण सोडणार नाही – निलेश राणे

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांचे ऑक्सिजन अभावी प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार यांनी साखर कारखान्यांच्या माध्यमातून ऑक्सिजन निर्मितीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी शरद पवारांनी साखर कारखान्यांना सूचनाही केल्या आहेत.
शरद पवार हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचेही अध्यक्ष आहेत. त्यामुळं या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील साखर कारखान्यांना पत्र पाठवलं आहे. कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभारावे आणि कारखान्याच्या सोयीसुविधांचा वापर करून ऑक्सिजन निर्मिती करावी. कारखान्याला वीज आणि वाफ उपलब्ध होऊ शकते, त्यामुळं साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मिती करावी अशा सूचना या साखर कारखान्यांना करण्यात आल्या आहेत. तसेच कारखान्यांची त्यांच्याकडे असलेल्या ऑक्सिजन किट रुग्ण किंवा रुग्णालयांना देण्याच्या सूचनाही कारखान्यांना देण्यात आल्या आहेत.
पण या मुद्द्यावरून नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणे यांनी पवारांवर जहरी टीका केली आहे. टीका करतानाच साखर कारखान्यांवर सॅनिटायझर निर्मितीत राज्याचे पैसे लुटल्याचा आरोपही केला आहे.
नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शरद पवारांवर ट्विटरच्या माध्यमातून हल्लाबोल केला आहे. शरद पवार ऑक्सिजन निर्मितीसाठी प्रयत्न करत असल्याच्या एका बातमीला रिट्विट करत निलेश राणेंनी ही टीका केली आहे. निलेश राणेंनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले की, साहेब आपण काही करू नका महाराष्ट्राचे डॉक्टर्स व या क्षेत्रातील इंडस्ट्रीज या विषयाचा मार्ग काढतील, असं निलेश राणेंनी म्हटलं. तुमचे साखर कारखाने या विषयात जर घुसले तर माणसासाठी हवेतला ऑक्सिजन पण सोडणार नाही, असं म्हणत राणेंनी टीका केली. तसंच आधीच सॅनिटायझर बनवण्याच्या नावाखाली साखर कारखान्यांनी महाराष्ट्राचे पैसे गिळले असतील, असा आरोपही त्यांनी केला.
राणे कुटुंबीय हे शिवसेनेवर नेहमची आक्रमकपणे टीका करत असल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र गेल्या काही दिवसांत निलेश राणेंनी शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका केल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र आता या टीकेनंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि राणे आमनेसामने येणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.
साहेब आपण काही करू नका महाराष्ट्राचे डॉक्टर्स व या क्षेत्रातील इंडस्ट्रीज ह्या विषयाचा मार्ग काढतील. तुमचे साखर कारखाने या विषयात जर घुसले तर माणसासाठी हवेतला ऑक्सिजन पण सोडणार नाही. अगोदरच सॅनिटायझर बनवण्याच्या नावाखाली साखरकारखान्यांनी महाराष्ट्राचे पैसे गिळले असतील. https://t.co/6cnJEt7kUm
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 23, 2021