भविष्यात पक्षाला जे काही यश मिळेल त्याचे वाटेकरी तुम्हीच असाल
१५ व्या वर्धापनदिना निम्मित मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून व्हिडिओ संदेश
मुंबई: मनसेच्या १५ व्या वर्धापनदिना निमित्त राज ठाकरे यांनी एक व्हिडिओ संदेश कार्यकर्त्यांना उद्देशून पाठविला आहे. त्यात त्यांनी भविष्य काळात पक्षला जे काही यश मिळेल त्याचे वाटेकरी तुम्हीच असला असे म्हटले आहे.
“बघता बघता एकत्र पाहिलेल्या स्वप्नाला आज १५ वर्ष पूर्ण झाली. १५ वर्षापूर्वी जेव्हा महाराष्ट्र नव निर्माण सेनेची स्थापना केली, त्यावेळी मनात धागधुग होती. मी ध्येयाने बाहेर पडून नव अस काही तरी करायला निघालो होतो. पण तुम्ही, लोक हे कस स्वीकार कराल याची मनात धागधुग होती. पण १९ मार्च २००६ च्या पक्ष स्थापनेनंतरच्या शिवतीर्थाच्या सभेत व्यासपीठावर पाऊल ठेवल आणि समोरचा अलोट समुदाय पाहिला आणि मानतील शंका दूर झाली.
माझ्यासह कोणालाही हेवा वाटेल अशी महाराष्ट्र सैनिकाची अचाट शक्ती आहे. या शक्तीचा माझ्यावर अढळ विश्वास आहे याची मला खात्री पटली. गेल्या १५ वर्षात महाराष्ट्र सैनिक रुपी संपत्ती टिकून आहे. कितीही खाच खळगे आले तरीही ती माझ्यासोबत उभी आहे. याच्या इतकी आनंदाची बाब कोणती. आपल्यात काही जण सोडून गेले. जाऊदे त्यांचा निर्णय लखलाभ ठरो. जे माझ्या सोबत सह्याद्रीच्या कड्या सारखे टिकून आहे. त्यांना मी एकच सांगेन मी तुम्हाला कधीही विसरणार नाही. भविष्यात पक्षाला जे काही यश मिळेल त्याचे वाटेकरी तुम्हीच असाल. जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र तुमच्या हातून घडवील. ते माझ तुम्हाला वचन आहे. १५ वर्षात केल ते अफाट, अचाट आहे. कोणतीही धनशक्ती पाठीमागे नसतांना राजकीय पार्श्वभूमी नसतांना स्वताचा नोकरी, व्यवसाय सांभाळून तुम्ही राजकारणात, समाजकारणात स्वतःला ज्या पद्धतीने रुजविले ते खरच कौतुकास्पद आहे. हजोरो आंदोलन, मोर्चे, अटक सत्र, जेलचे वारे हे सगळा कशासाठी तर आपल्या भाषेसाठी, मराठी माणसाच्या हितासाठी, त्यांच्या न्यायासाठी. आणि स्वधर्म रक्षणासाठी. या सगळ्यांसाठी माझ्या मनात कृतज्ञता आहेच ती आयुष्भर राहणार आहे.
पण मी खात्रीने सांगतो महाराष्ट्राच्या मनात देखील तुमच्या बद्दल कृतज्ञता आहे. ही भावना सैदेव राहिल, निवडणुकीत यश, पराभव पाहिला. पराभव पाहिल्या नंतर तुमची लढाईची हिंमत कमी झाली नाही.
आजही महाराष्ट्रातील अनेक घटकांना वाटत कि, आपला प्रश्न मनसेच सोडवू शकते, त्यातच भविष्यातील उष:कालाची बीज रोवली आहे, ते विसरू नका. तुमचे कष्ट वाया जाणार नाही. तुमच्या घरच्यांनी फार त्याग केला. सगळी आव्हाने पेलून पुढे आले. पहिला वर्धापनदिन आहे आपण भेटू शकत नाही. भेटायला तुमच्या बरोबर मी सुद्धा आतुर आहे. सध्याची परिस्थिती पाहता गर्दी जमविणे चालणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ संदेश पाठविला आहे. आपण पुन्हा भेटू तो पर्यंत काळजी घ्या. पुन्हा एकदा सदस्य नोंदणी सुरु करत असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.