Friday, October 7, 2022
HomeUncategorized'या' इंग्रजामुळे आपण मराठीत विरामचिन्हे वापरायला सुरूवात केली

‘या’ इंग्रजामुळे आपण मराठीत विरामचिन्हे वापरायला सुरूवात केली

वाचताना थांबायचे कुठे आणि नेमका कोणत्या शब्दावर जोर द्यायचा हे आपल्याला कसे कळते? तर यासाठी विरामचिन्हांचा उपयोग होतो. मराठी ही मोडी लिपीत लिहिली जाई. त्या लिपीत विरामचिन्हे नव्हती, संस्कृतमध्येही ‘दंड’ सोडल्यास अन्य विरामचिन्हे नव्हती. मराठी-इंग्रजी शब्दकोश कार ‘मेजर थाॅमस कँडी’ यांनी मराठी देवनागरीत लिहायला सुरुवात केली आणि विरामचिन्हे पहिल्यांदा वापरली. आणि थॉमस कँडी यांच्याचमुळे आपल्याला विरामचिन्ह्यांची ओळख झाली. आणि नंतर विरामचिन्हे लोकमान्य आणि रूढ होत गेले.

भाषेमधील एखादा उतारा वाचताना विरामचिन्हांचा वापर किती महत्त्वाचा आहे हे आपण जाणतो. एखादे वाक्य वाचताना आपण काही वेळ थांबतो म्हणजेच विराम घेतो. हा विराम किती वेळ घ्यायचा हे आपण तिथे वापरलेल्या विराम चिन्हानुसार ठरवतो. लेखनात विरामचिन्हे नसतील तर वाक्य कुठे सुरू झाले आणि कुठे येऊन संपले हे आपल्याला समजणार नाही. म्हणून विरामचिन्हांचा वापर लिखाणात कुठे आणि कधी करायचा आहे आपल्याला समजलेच पाहिजे. पूर्णविराम (.), अर्धविराम(;), स्वल्पविराम(,), अपूर्ण विराम(:), प्रश्नचिन्ह(?), उद्गारचिन्ह(!), अवतरण चिन्ह(“,’), अपसारण चिन्ह(-), संयोग चिन्ह(-), लोप चिन्ह(…) आणि दंड (|) अशाप्रकारे हे विराम चिन्ह यांचे प्रकार आहेत हे आपण व्यकरणामध्ये शिकलोच आहोत.

विराम चिन्हांचा वापर भावनांच्या, विचारांच्या आविष्कारासाठी आवश्यक व महत्त्वाचा ठरतो पण ज्यांनी ही विरामचिन्हे आपल्या मराठी भाषेत आणले त्या व्यक्ती बद्दल आपण जाणून घेऊया, तर ते म्हणजेच मेजर थॉमस कँडी हे होय. ते एकोणिसाव्या शतकातील एक प्रसिद्ध इंग्रजी-मराठी कोशकार व शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांचा जन्म १३ डिसेंबर १८०४ ईस्ट नॉयले (व्हिल्टशर, इंग्लंड) येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी मॅग्डेलेन कॉलेज (ऑक्सफर्ड विद्यापीठ) येथे शिक्षण घेतले. कँडी यांनी १८२२ मध्ये भारतीय भाषांचा अभ्यास केला, येथील भाषांमधील ज्ञान संपादन केल्यामुळे त्यांची ईस्ट इंडिया कंपनीतील पायदळात दुभाषी व क्वार्टर मास्टर ह्या पदांवर शिफारस करण्यात आली. त्यांनी भारतातील ब्रिटिश लष्करातील लेफ्टनंट, कॅप्टन व मेजर ह्या हुद्द्यांवर काम केले; तथापि त्यांच्याकडे दुभाषाचेच प्रमुख काम असे.

जेम्स मोल्सवर्थ यांनी कँडी यांना आपल्या इंग्रजी-मराठी कोशकामासाठी साहाय्यक म्हणून घेतले. परंतू काही कामानिमित्त मोल्सवर्थ हे इंग्‍लंडला गेल्यामुळे हे काम लांबणीवर पडले. या वेळी तोपर्यंतची जबाबदारी पार पाडायची म्हणून कँडी यांनी सरकारी नियमावलीतील मराठी भाषांतरातील काही चुका दुरुस्त केल्या होत्या. तेव्हा कँडी यांना १८३५ मध्ये सरकारने हिंदु कॉलेज व दक्षिणेकडील सरकारी शाळा यांचा सुपरिटेंडेंट म्हणून त्यांची नेमणूक केली. नंतर १८३७ मध्ये पुणे पाठशाळेच्या मुख्याध्यापकाचे कामही आले होते. त्याचदारम्यान त्यांनी पुण्याच्या शाळेतील अनेक विद्वान पंडितांची मदत घेऊन त्यांनी अपूर्ण राहिलेल्या इंग्रजी-मराठी कोशाचे काम स्वीकारले आणि खूप मेहेनतीने सहा-सात वर्षांत (१८४० ते ४७) ते काम पूर्ण केले. आणि या कोशाच्या कामानंतर त्यांनी आपले सर्व लक्ष मराठी पाठ्यपुस्तके व इंग्रजी ग्रंथांचे सुगम भाषांतर यांवर केंद्रित केले. इतरांनी केलेल्या भाषांतरामधल्या दुरुस्त्या व सुधारणा ते करीत असायचे. सुटसुटीत आणि सोप्या भाषेवर त्यांचा कटाक्ष असायचा.

थॉमस कँडी यांनी अशाप्रकारे ‘नीतिज्ञानाची परिभाषा’ (१८४८), ‘द इंडियन पीनल कोड (१८६०)’, ‘न्यू पीनल कोड’ इत्यादी अनुवादित मराठी पुस्तके त्यांनी प्रसिद्ध केली. तसेच याशिवाय त्यांनी इसापनीतिकथा, हिंदुस्थानचा इतिहास, बाळमित्र, हिंदुस्थानातील इंग्‍लिशांच्या राज्याचा इतिहास वगैरे भाषांतरित पुस्तके तपासून त्यात भाषेच्या दृष्टीने अनेक महत्वाच्या दुरुस्त्या व सुधारणा केल्या.

आणखी एक महत्वाचे त्यांचे कार्य म्हणजे, पाठ्यपुस्तकांबाबतचे त्यांचे धोरण समंजस व तत्कालीन शिक्षणास पोषक होते. तसेच त्यांच्या पाठ्यपुस्तकांबाबतच्या सुधारणा देखील महत्वाच्या ठरल्यात. त्यांच्या या कार्यामुळे पुढे त्यांस पूना कॉलेजचे प्राचार्यपद देण्यात आले (१८५१-५७). १८६७ मध्ये काही दिवस ते डेक्कन कॉलेजमध्ये प्राध्यापकही होते. अखेरच्या दिवसांत ब्रिटिश सरकारच्या प्रमुख भाषांतरकर्त्याचे कामही त्यांच्याकडे सोपविण्यात आले होते.

कँडी यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासात उपयोगी ठरतील अशी,  नीतिबोधकथा (१८३१), नवीन लिपिधारा, विरामचिन्हांची परिभाषा (१८५०), वाचनपाठमाला (१८५०), भाषणसांप्रदायिक वाक्ये (१८५८), हिंदुस्थानचे वर्णन (१८६०) इत्यादी ग्रंथ लिहिलेत. कँडी यांनी सुमारे तीस-बत्तीस वर्षे मराठी भाषेची सेवा केली. मराठी भाषेस आधुनिक वळण लावण्यात त्यांचे फार मोठे योगदान आहे.

मराठीत आधुनिक इतिहासातील ग्रंथामधील असलेल्या शैलीवर कँडी यांची छाप दिसून येते. शाळा-महाविद्यालये खात्याशी व दक्षिणा प्राइझ कमिटीशी कँडी यांचा अधिकारी या नात्याने संबंध होता. ग्रंथपरीक्षण, मुद्रणालय व भाषांतर यासंबंधीही ते प्रमुख होते. मराठी कोशरचना व व्याकरण तयार  करण्यात त्यांची मुख्य भूमिका होती. मराठी पाठ्यपुस्तके तयार करून घेणे, ग्रंथांच्या नवीन आवृत्त्या तयार करणे अशी महत्वाची कामेही सरकारने त्यांच्याकडेच सोपविली होती. अव्वल इंग्रजीच्या आरंभकाळात वाक्यरचनेतील शैथिल्य व अनियमितपणा काढून तिला बंदिस्तपणा आणण्याचे श्रेय कँडी यांनाच द्यावे लागेल. मराठी भाषेत विरामचिन्हे वापरण्याची पद्धती प्रथम कँडीनेच सुरू केली. मराठी भाषेच्या दृष्टीने इंग्रजी-मराठी भाषाकोश/शब्दकोश हे त्यांचे मोलाचे कार्य भारतीय साहित्यिक आणि विध्यार्थी कधीच विसरणार नाहीत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments