योगी आदित्यनाथ यांनी केली नव्या चित्रपट संस्थेची घोषणा

लखनऊ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १ मार्च रोजी त्यांच्या ‘फिल्म सिटी’ प्रकल्पांतर्गत राज्यात एका नव्या चित्रपट संस्थेच्या स्थापनेची घोषणा केली आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतर मुंबई येथील बॉलीवुड विषयी माध्यमांमध्ये बरीच खळबळ माजली. त्याचबरोबर समाजामध्ये बॉलीवुड विषयी नाराजी पसरली होती. याच दरम्यान उत्तर प्रदेश सरकारकडून बॉलीवुडला पर्याय म्हणून नोएडा येथे एक हजार एकर जागेमध्ये ‘फिल्म सिटी’ प्रकल्पाची घोषणा केली होती. हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांनी याला पाठींबा देखील दिला होता.
१ मार्च रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गौतम बुद्ध नगर येथे या प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. बॉलीवुडच्या धर्तीवर या नव्या फिल्म सिटी मध्ये सर्व आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची हमी दिली आहे. नोएडा येथे लवकरच तयार होणाऱ्या ‘फिल्म सिटी’ प्रकल्पामधील ४० एकर जागेमध्ये या चित्रपट संस्थेची स्थापना होणार असून त्याची काही ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेतः
- या संस्थेमध्ये प्रतिभासंपन्न विद्यार्थ्यांना विविध शैलीच्या चित्रपट व दूरचित्रवाणी निर्मितीचे अत्याधूनिक प्रशिक्षण मिळणार आहे.
- अभिनय, निर्मिती, दिग्दर्शन, संपादन, नृत्य दिग्दर्शन, पटकथा लेखन आणि साउंड रेकोर्डिंगचे अद्ययावत प्रशिक्षण या संस्थेतर्फे प्रदान केले जाणार आहे.
- व्हीएफएक्स, गेमिंग आणि ॲनिमेशन शिकण्यासाठी सुविधा आणि प्रशिक्षण देखील येथे उपलब्ध होणार आहे.
- चित्रपट सृष्टीतील नामांकित दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांचा सल्ला घेऊन ही फिल्म सिटी उभारण्याची योजना.
- चित्रपट संस्थेसोबतच या फिल्म सिटीला एक पर्यटन केंद्र देखील बनवण्याचे राज्य सरकारने योजिले आहे.