Saturday, October 1, 2022
HomeUncategorizedमेघना पेठे लिखित: हंस अकेला

मेघना पेठे लिखित: हंस अकेला

विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात गोष्टी सांगणाऱ्या आणि ऐकणाऱ्या कथावेल्हाळ मराठी माणसाला गदागदा हलवणारी गोष्ट लिहीत मेघना पेठे पुढं आल्या.समाजाची नैतिक चौकट पाळून लिहिणाऱ्या शतकाअखेरीस स्त्री पुरूष नात्यासंदर्भाने,’धर्म-जात-लग्न-संतती’ आदी व्यवस्थांप्रमाणे मेघना जे बोलू पाहत होत्या त्याने ‘मर्यादित अभिरुची’च्या चौकोनी वाचकांना बिथरायला झालं हे खरंच! कारण मेघना थेट लिहीत होत्या,मोडण्याचा आव न आणता तिरपे छेद घेत होत्या,स्त्री पुरूष नात्यांच्या असंख्य वलयानंतर उरणाऱ्या रितेपणाविषयी काही मूलभूत बोलू बघत होत्या. त्यांच्या अशाच कसदार,पूर्णतः नव्याकोऱ्या आणि धाडसी कथांचं संकलन म्हणजेच ‘हंस अकेला’. हा त्यांचा पहिलाच कथासंग्रह.

‘माणसाला मुलं जन्माला घालावी वाटतात तीही अशी,आयुष्यात अडकण्याचा हेतू म्हणूनच की काय?’, ‘सोडलेलं घर सोडलेल्या नवऱ्यासारखंच दिसतं,घायाळ आणि गरीब’ अशी टोकदार निवेदनं पेरत मेघना ‘समुद्री पाणी चोहीकडे’ या कथेत समाजाची नैतिकता-परस्परपूरक लैंगिकता-लैंगिक गरजांची व्यवहारता असं वर्तुळ मांडून लैंगिकतेची नैसर्गिक उर्मी समाजनियम कशी ठिसूळ करते आणि मग ती इतर मार्गांनी फेसाळत राहते याकडे लक्ष वेधतात.

सामान्य जीवनाबरोबरच खालावत चाललेल्या नाट्य क्षेत्रातल्या संघर्षाची आणि त्या अनुषंगाने एका कलाकाराच्या घुसमटीची कथा म्हणजे ‘एक दिवस ‘स्ट्र’…चा ‘प्रसिद्धीची क्षणभंगुरता समजूनही टाळता येण्यासारखी नसते. वयाची गती आणि प्रसिद्धीची गती कलाक्षेत्रात व्यस्त गुणोत्तरही दाखवते कधीकधी. तेव्हा एक भेसूर वास्तव उरतं. भावनांच्या कळवळ्यापलीकडे प्राक्तन उरतं हे सांगणारी ‘लाईट्स ऑफ’ही कथा.

आई ‘बाई’ असते आणि बाप ‘पुरुष’ हे विसरूनच जातात ‘मुलं’ आणि ‘समाजही’. रजोनिवृत्तीनंतर बदलणाऱ्या शरीरातल्या रसायनांचं संतुलन नैतिक चौकटीत कसं करणार ? झाकून घेऊ तेवढी उघडी पडणारी प्रामाणिक वासना प्राप्त पर्यायांनी शमवली तर? आग रिझवली जातेच तरीही तेव्हा तिला ‘न-नैतिक’ म्हणूयात का? असा एक संथ पण दुखरा प्रश्न मेघना वाचकांकडे सरकवतात.  

दोन नडलेली माणसं एकमेकांचं न्यून झाकून घेतात का? की आंधळ्या-पांगळ्यांच्या गाठी बांधण्यात समाज आपला नैतिक कंड शमवून घेत असतो? तडजोडीचं समर्थन नक्की कोणत्या किमतीवर करायचं आणि त्यात बाई-बाप्या हा भेद असेल का? असे  खोलवर चिरत जाणारे प्रश्न मेघना विचारत राहतात.

मराठी लेखकांच्या रडारवर असणारा मध्यमवर्ग सामावून त्यापलीकडे जाणाऱ्या वर्ग-लिंग-छटा मेघना स्वतःचं वेगळं रंगपत्रक घेऊन जोखू बघतात. जितकी आपली ‘उमजण्या’ची ताकद मोठी तितकं ‘भंगणं’ अधिक ही जाणीव देऊ बघतात. कोणाची बाजू घेत नाहीत. साऱ्यांना सारखा प्रवेश आणि निरोप देण्याचा वकूब लेखक म्हणून त्यांना न्यायी ठरवतो. कबीर म्हणतात तसं,

‘ जैसे पात गिरे तरुवरके

मिलना बहुत दुहेला,

क्या जाँनू,किधर गिरेगा

लग्या पवनका रेला..

.. उड जायेगा,हंस अकेला !’  

याचा अन्नयार्थ म्हणजेच हा कथासंग्रह !  

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments