चिंताजनक! देशात कोरोना रुग्णसंख्येचा नवा विक्रम

नवी दिल्ली: देशात कोरोना रुग्णसंख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कोरोना रुग्णसंख्येचा रोज एक नवा उच्चांक नोंदवला जात आहे. याच दरम्यान काल एकाच दिवसात १३४० रुग्णांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. भयावह स्थिती म्हणजे स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठीदेखील अनेक तास वाट पाहावी लागत आहे. रुग्णालयांच्या बाहेर रुग्णांच्या मोठमोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत. एकीकडे कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या वाढत्या प्रमाणानं चिंतेत भर घातली आहे, तर दुसरीकडे वाढत्या रुग्णसंख्येमुळे अर्ध्याहून अधिक लोक घरामध्येच कैद झाली आहेत.
काल कोरोना रुग्णांच्या संख्येनं पुन्हा नवा उच्चांक गाठला आहे. देशात एका दिवसात २,३३,८६९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. वाढती रुग्णसंख्या पाहाता देशातील १५ राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नाईट कर्फ्यू किंवा वीकेण्ड लॉकडाऊन करणं भाग पडलं आहे. सध्याच्या परिस्थितीत विविध निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर तब्बल ५७ टक्के लोकसंख्या घरांमध्येच कैद झाली आहे.
१६ एप्रिलच्या आधी भारतात एकाच दिवसात सर्वाधिक मृत्यू झाल्याचं गेल्या वर्षी १५ सप्टेंबरला पाहायला मिळालं होतं. तेव्हा १,२८४ रुग्णांनी आपला जीव गमावला होता. एका विश्लेषणानुसार, देशात पुढच्या दोन दिवसात ७०० मिलियनहून अधिक लोक ठराविक कालावधीसाठी कर्फ्यूचा सामना करतील. देशात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर उद्भवलेली परिस्थिती पाहात हे निर्बंध गरजेचे असल्याचं स्पष्ट आहे.
१६ एप्रिलपर्यंत दररोज कोरोनाचे १८८,४०० नवे रुग्ण समोर येत होते. पहिल्या लाटेमध्ये कोरोना पीक पॉईंटवर असतानाही एवढे रुग्ण आढळत नव्हते. १६ सप्टेंबर २०२० ला जेव्हा कोरोना पीक पॉईंटवर होता, तेव्हा भारतात ९३,६१७ नवे कोरोना रुग्ण समोर आले होते. ही परिस्थिती पाहाता आता देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली आहे.