Tuesday, October 4, 2022
HomeZP ते मंत्रालयकायम बाळासाहेबांच्या सावलीत वावरलेले उद्धव ठाकरे शिवसेना पुन्हा उभी करून दाखवणार का?

कायम बाळासाहेबांच्या सावलीत वावरलेले उद्धव ठाकरे शिवसेना पुन्हा उभी करून दाखवणार का?

विद्यमान शिवसेना पक्षप्रमुख आणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज ६२वा वाढदिवस. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान झालेले पहिले ठाकरे.राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीपासून उद्धव ठाकरेंना पदोपदी टीकेला सामोरं जावं लागलं. अनेकदा त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं.

पण ठाकरेंनी प्रत्येक लहान-मोठ्या प्रसंगांमधून स्वतःला सिद्ध करत थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारली. त्यांच्या वाढदिवसानिम्मित राजकीय कारकीर्दीचा घेतलेला हा आढावा

उद्धव ठाकरे यांचा जन्म २७ जुलै १९६० रोजी झाला. बाळासाहेब आणि मीनाताईंचे उद्धव हे तिसरे अपत्य. ते पूर्वी शिवसेनेचे ‘सामना’ हे मराठी दैनिक हाताळायचे आणि पक्षाच्या निवडणुकीशी संबंधित कामातही भाग घेत.

१९९०च्या सुरवातीला उद्धव यांची प्रतिमा खालमानेने वावरणारे आणि राजकीय डावपेचांची आवड नसलेले व्यक्तिमत्त्व अशी होती. त्यांच्या स्वभाव शांत आणि मृदुभाषी होता. आपल्या याच स्वभाव वैशिष्ट्यामुळे उद्धव शिवसेनेतील जेष्ठ नेत्यांच्या जवळचे झाले.

राज विरुद्ध उद्धव- पहिल्या वादाची ठिणगी:

डिसेंबर १९९१ मध्ये राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या इमारतीवर बेरोजगारांचा एक मोर्चा आयोजित केला होता. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होतं. तेव्हा सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते. या मोर्चाला खूप जोरदार प्रतिसाद मिळाला होता. यासाठी राज ठाकरेंनी खूप प्रयत्न केले होते, संपूर्ण राज्य पिंजून काढलं होतं.

नागपूरचा हा मोर्चा भव्यदिव्य होणार याची स्पष्ट चिन्हं दिसू लागली होती. त्या रात्री राज ठाकरेंना थेट मातोश्रीवरुन फोन आला. मोर्चामध्ये ‘उद्धवलाही भाषणाची संधी द्या’.  झालं, इथंच राज आणि उद्धव वादाची ठिणगी पडली. राज ठाकरेंना वाटले की उद्धव ठाकरे आपलं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतायत आणि ते नाराज झाले.

दुसऱ्या दिवशी एका ट्रकवर लाकडी फळ्यांच्या साहाय्याने व्यासपीठ तयार करण्यात आलं होतं. त्यावर शिवसेनेचे मान्यवर बसले होते. त्यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशींनी घोषणा केली की, आता उद्धव ठाकरे भाषण करतील. त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंनी ५० हजारांहून अधिकांच्या जमावापुढे आपलं पहिलंवहिलं जाहीर भाषण केलं. पण यामुळे राज ठाकरे मात्र दुखावले गेले.

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे:

स्थळ होते महाबळेश्वर. तारीख होती ३० जानेवारी २००३. शिवसेनेचे अधिवेशन महाबळेश्वर येथे बोलविण्यात आले होते. राज ठाकरे भाषणासाठी उभे राहिले आणि शिवसेना पक्षात नवीन निर्माण झालेल्या शिवसेना कार्याध्यक्ष ह्या पदाकरिता शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांची निवड प्रतिनिधी सभेने करावी असा प्रस्ताव राज यांनी ठेवला. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

महाबळेश्वरला झालेल्या या परिषदेत शिवसेनेतील बाळासाहेबांच्या वारसदाराला मुद्दा एकदाचा कायमचा निकाली निघाला. राज यांनीच उद्धव ठाकरेंचे नाव सुचवल्याने निकाल सर्वस्वी उद्धव ठाकरेंच्या बाजूनेच लागला.

पुढे, जेव्हा राज शिवसेनेपासून दुरावले तेव्हा बाळासाहेब ठाकरे वारंवार या गोष्टीची आठवण करून देत की राजनेच उद्धवच्या नाव कार्याध्यक्षपदासाठी सुचवले. तसेच आपल्याला या सगळ्या प्रकरणाची काहीच पूर्वकल्पना नव्हती असाही दावा बाळासाहेबांनी केला.

मात्र, राज यांनी नंतर सांगितले की ‘मला एखाद्या शाखाप्रमुखाचीही नेमणूक करण्याची सत्ता शिवसेनेत नव्हती मग मी कार्याध्यक्षाची नेमणूक कशी करीन? महाबळेश्वरच्या परिषदेआगोदरच बाळासाहेबांना हे करायचे होते. पण, माझा अडथळा होईल असे त्यांना वाटत होते. म्हणूनच हे सगळे माझ्याकडून सक्तीने वदवून घेण्यात आले.

आपली शिवसेनेत होणारी घुसमट असहाय्य झाल्याने राज यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा राजकीय पक्ष काढला. तत्पूर्वी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा देताना राज यांनी माझा वाद हा मातोश्रीतल्या विठ्ठलाशी नाही तर त्याच्याभोवती असणाऱ्या बडव्यांशी आहे असं वक्तव्य कले. अर्थातच त्यांचा रोख उद्धव ठाकरेच होते.

राज शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी संघटनेवर एकहाती पकड मिळवली. २०१२ साली बाळासाहेबांचे निधन झाल्यावर ठाकरे बंधू एकत्र येतील या चर्चेने जोर धरला होता. मात्र या फक्त चर्चाच ठरल्या.

उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात मतभेद कुठून सुरु झाले?

झालं असं की ९५ साली आलेलं युतीचं सरकार जवळपास टर्म पूर्ण करत आलं होतं. पण शेवटच्या सहा महिन्यांच्या कालावधीत मोठी घडामोड घडली ती म्हणजे, मनोहर जोशी यांना जावयाच्या अवैध बांधकाम प्रकरणावरून राजीनामा द्यावा लागला होता.

मनोहर जोशी मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी नारायण राणे यांची मुख्यमंत्री पदावर वर्णी लागली.

पुढे सहाच महिन्यात विधानसभा निवडणूक पार पडली. त्या निवडणुकीत काँग्रेसला सगळ्यात जास्त म्हणजे ७५जागा मिळाल्या होत्या. तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या शिवसेनेला ६९ जागा मिळाल्या होत्या. युतीच्या सत्तेत छोट्या भावाची भूमिका पार पडणाऱ्या भाजपला ६५ जागा मिळाल्या होत्या. तर राष्ट्रवादीला सर्वात कमी म्हणजे ५८ जागा मिळाल्या.

युतीला एकूण १३४ जागा मिळाल्या तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला १३३. सत्तास्थापनेसाठी युतीला ११ आमदारांची तर काँग्रेस- राष्ट्रवादीला १२ आमदारांची गरज होती. युतीनं अपक्ष आमदारांची जुळवाजुळव करायला सुरुवात केली तेंव्हा ते १३६ चा आकडा पार करू शकले नाहीत.

त्यामुळे युतीचं सरकार येऊ शकेलं नाही. जर का सेनेकडे बहुमताचा आकडा पार करण्यासाठी ११ आमदार असते, तर कदाचित पुन्हा एकदा महाराष्ट्रात सेनेचा मुख्यमंत्री झाला असता.

पण निवडणूकीआधी जागावाटप सुरू असताना उद्धव ठाकरेंनी स्वतः हस्तक्षेप करत १५ उमेदवारांच्या नावात बदल केले होते. ज्या १५ उमेदवारांचं उद्धव ठाकरेंनी तिकीट कापलं त्यातील जवळपास ११ उमेदवार दुसऱ्या पक्षात जाऊन विजयी झाले.असा दावा नारायण राणे यांनी आपल्या ‘नो होल्ड्स बॅरड: माय इयर्स इन पॉलिटिक्स’ या आत्मचरित्रात केला आहे.

जर उद्धव ठाकरेंनी हस्तक्षेप करून १५ उमेदवारांच्या यादीत बदल केले नसते, तर कदाचित सेनेनं भाजपला सोबत घेऊन पुन्हा सत्ता मिळविली असती, असं राणेंना वाटायचं.

१९९९ मध्ये पुन्हा सरकार आले तर आपणच मुख्यमंत्री होऊ, असा विश्वास नारायण राणे यांना होता. मात्र, त्याचं स्वप्नं उद्धव ठाकरेंमुळेचं पूर्ण हाऊ न शकल्याची त्यांना खंत आहे.याच घटनेपासून नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मतभेद वाढत गेले.

२५ वर्षांची युती उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात तुटली:

२०१४ साली विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपने शिवसेची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. तब्बल २५ वर्षे युतीत असणारे दोन्ही पक्ष वेगळे वेगळे निवडणुकीला सामोरे गेले.

बहुमत न मिळवू शकल्याने भाजपने शिवसेनेला पुन्हा सरकार मध्ये सामील करून घेतले. मात्र, १४ ते १९ या पाच वर्षात शिवसेनेची मोठ्या प्रमाणावर फरफट करण्यात आली. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकातून रोज भाजपवर तोफा डागण्यात येऊ लागल्या.

२०१९ची निवडणूक भाजप-शिवसेना एकत्र लढले मात्र,निकालानंतर मुख्यमंत्रीपदाच्या वादावरून ही युती पुन्हा तुटली शिवसेनेनं आपले राजकीय विरोधक असणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी हातमिळवणी करत राज्यात महाविकास आघाडीचा यशस्वी प्रयोग केला.

उद्धव ठाकरेंनी वडील बाळ ठाकरे यांच्या सावलीत राहून राजकारण केले. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्याकडे शिवसेनेची कमान आली, त्यानंतर त्यांनी पक्षाला अनेक अडचणीतून बाहेर काढत पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्तेचे शिखर गाठले, ज्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस स्वप्ने पाहिली होती.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. मात्र, ठाकरे सरकारला अडीच वर्ष पूर्ण होताच शिवसेनेच्या इतिहासातील सगळ्यात मोठं बंड करत शिवसेनेतील दुसऱ्या नंबरचे नेते एकनाथ शिंदे शिवसेनेतील तब्बल ४० आमदारांना घेऊन भाजपाला मिळाले. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. भाजपने शिंदेंना मुख्यमंत्री केले.

खरी शिवसेना कोणाची या वरून आता शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांचा वाद सुप्रीम कोर्टात गेला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंसमोर शिवसेना वाचवणे आणि शिवसेनेला पुन्हा उभी करणे यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.

हे ही वाचा:      

ईडीची लक्ष्मण रेषा सुप्रीम कोर्टाला अमान्य; PMLA प्रकरण आहे तरी काय?

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments