अमित शहांचा राजीनामा मागणारे नवाब मलिक मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणार का? प्रविण दरेकरांचा सवाल

मुंबई : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असले तरी त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचं पहायला मिळत आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर अमित शहा यांनी राजीनामा देण्याचं वक्तव्य केल्यावर आता प्रवीण दरेकर यांनी नवाब मलिकांना प्रत्युत्तर दिलं आहे.
निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यांनतर नवाब मलिक यांनी निकालावर प्रतिक्रिया देत म्हटले, पश्चिम बंगालमध्ये ज्या प्रकारचं वातावरण गेल्या २-३ वर्षांत निर्माण केलं गेलं आहे. या देशाचे गृहमंत्री केवळ आकडे फेकत आहेत. अबकी २०० के पार. किती खोटं बोलावं. नेहमी आकडे फेकून एकही मटका त्यांचा लागत नाही. लोकांनी भाजपला बंगालमध्ये नाकारलं आहे. जी परिस्थिती देशात कोविडमुळे निर्माण झाली आहे. त्याची जबाबदारी स्वीकारुन, जेव्हा ममता दीदींनी सांगितलं की अमित शहांनी राजीनामा दिला पाहिजे. तेव्हा अमित शहा सांगत होते जनतेने सांगितलं तर मी राजीनामा देईन. आता निकाल लागलेला आहे. बंगालच्या जनतेने त्यांचा राजीनामा मागितला आहे. तात्काळ अमित शहांनी राजीनामा दिला पाहिजे ही आमची मागणी आहे.
यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर देत म्हटलं, नवाब मलिक यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीसंदर्भात अमित शहा यांच्या अपयशासाठी राजीनामा देण्याची मागणी केली. मला वाटतं नवाब मालिकांना यशाची व्याख्याच माहिती नाही. ३ वरुन आज ८० जागांवर पोहोचलो आहे. देशातील पाच राज्यांत निवडणुका असताना आसाम, पुदुच्चेरीत भाजपचा विजय झाला आहे. बेळगाव, पंढरपुरात भाजपचा विजय झाला आहे. देशभरात भाजपला जनाधार असल्याचं चित्र आहे तरीही देशातील एका राज्यात सत्ता आली नाही म्हणून राजीनामा मागणाऱ्या नवाब मलिक यांना मला सांगायचं आहे की, पंढरपूर विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडी सरकारने एकत्रित ताकदीने लढून सुद्धा पराभूत झाले आहेत मग तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणार का? असा प्रश्न नवाब मलिक यांना मला विचारायचा आहे.