भाजपचे नेते संजीव भटांच्या पत्रावर असाच थयथयाट करणार का?
नवी दिल्ली: काल संसदेत बोलताना भाजप नेत्यांनी महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करावं अशी मागणी केली होती. एक ज्येष्ठ पोलीस अधिकारी आपल्या पत्रातून सरकार, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यावर प्रश्न उपस्थित करतात असं सांगत भाजप नेत्यांनी संसदेत गोंधळ घातला होता. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर महिन्याला १०० कोटी रुपये जमा करायचा आदेश दिल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्याना पत्र लिहलं होतं. यावर गृहमंत्र्यांची खुर्ची जाणार की राहणार ही चर्चा सुरु होती. यासगळ्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री राजीनामा देणार नाहीत असं स्पष्ट केलं.
संजय राऊत यांनी सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. परमबीर सिंह राज्य सरकारवर दबाव आणत असतील तर सरकारने त्याचा विचार करावा असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रातील आरोपांची चौकशी करण्यात यावी यासाठी परमबीर सिंह यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. त्यावर बोलताना शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, परमबीर सिंह कोर्टात गेले ही चांगली गोष्ट आहे. राज्यसभेत रंजन गोगाई आहेत, त्यांनी सुप्रीम कोर्टात न्याय मिळत नाही असं वक्तव्य केलं होतं. या दबावाचा वापर करून परमबीर सिंह यांना काम करून घ्यायचं असेल तर ते न्यायालयात जाऊ शकतात. ईडी, सीबीआय ,सुप्रीम कोर्ट यांचा राजकारणासाठी वापर केला जातो हे राजन गोगाई यांचं म्हणणं आहे, त्यांच्यावर मी विश्वास ठेवतो.
नरेंद्र मोदी गुजरातचे मुखमंत्री असताना आयपीएस अधिकारी संजीव भट आणि अधिकारी शर्मा यांनी तत्कालीन सरकारवर अशाच गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. त्यांची ही पत्र आम्ही समोर आणली तर भाजपचे नेते असाच थयथयाट करायला तयार आहेत का, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
गुजरातमध्ये एक न्याय आणि महाराष्ट्रात दुसरा?
मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रातील आरोपांची चौकशी करण्यात यावी यासाठी परमबीर सिंह यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. त्यावर बोलताना शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, “रविशंकर प्रसाद हे कायदा मंत्री आहेत. गुजरातमध्ये मोदी मुख्यमंत्री असताना आयपीएस अधिकारी संजीव भट यांनी गुजरातच्या सरकारवर आरोप करणारे पत्र लिहिले होते. त्या आधारावर गुजरात सरकारच्या पूर्व मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली का? संजीव भट यांनी केलेले आरोप जास्त गंभीर होते. त्यांना तुरुंगात टाकलं गेलं. गुजरातमध्ये एक न्याय आणि महाराष्ट्रात दुसरा न्याय द्यायचा का?”
राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फरक नाही
“राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फरक नाही. पवार साहेबांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याविषयी जी भूमिका मांडली ती सरकारची भूमिका आहे. अशा पांचट पत्रावरून गृहमंत्री, मुख्यमंत्री यांचे राजीनामे घेतले तर कुणीही राज्य करु शकणार नाही. आमच्याकडे पण गुजरातमधील पत्र आहेत ती रविशंकर प्रसाद यांना पाठवू.” असं देखील संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणालेत.