रेमडेसिवीर होणार आणखी स्वस्त! ‘हे’ आहे कारण .

नवी दिल्ली : राज्यासह देशभरात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना दिलासादायक बातमी समोर येतेय. येत्या काळात रेमडेसिवीर इंजेक्शनची किंमत आणखी कमी होणार आहे. रेमडेसिवीरच्या कच्च्या मालावरील आयात शुल्क माफ केल्याने ही किंमत कमी होणार आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनवर ३१ ऑक्टोबरपर्यंत आयात शुल्क माफ करण्यात आलाय. इंजेक्शनची टंचाई रोखण्यासाठी केंद्राने अधिसूचना जाहीर केलीय.
देशात रेमडेसिवीरची वाढती मागणी आणि टंचाई लक्षात घेता केंद्र सरकारनं रेमडेसिवीर इंजेक्शन तसंच इंजेक्शन तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील आयात शुल्क माफ केलंय.
यामुळे देशात रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्मीती करण्यास तसंच आयात वाढवण्यास मदत मिळणार आहे. केंद्र सरकारनं तशी अधिसूचना जारी केलीये. ३१ ऑक्टोबरपर्यंत या औषधावरील आयातशुल्क माफ करण्यात आलंय. यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनची किंमत आणखी कमी झालेली दिसेल.
किंमतीत कपात
देशातील कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होतेय. यासंदर्भात केंद्राने एक मोठा निर्णय घेतला असून रेमडेसिवीर इंजेक्शनच्या किंमतीत मोठी कपात करण्याची घोषणा करण्यात आलीय. कंपन्यांनी या किंमतीत ७० टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. यापूर्वी वाढती मागणी लक्षात घेता रेमडेसिवीर औषधाचे उत्पादन वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतलाय.
केंद्रीय रसायन आणि खत मंत्री सदानंद गौडा म्हणाले की, रेमडसवीरचे उत्पादन वाढविण्यासाठी सरकार आवश्यक ती सर्व पाऊले उचलत आहे. गेल्या पाच दिवसांत सहा लाख ६९ हजार रेमडीसीवर वेगवेगळ्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. रेमडेसीवीरचे उत्पादन २८ लाख प्रतिमहिना वाढवून ४१ लाख प्रति महिना इतकी करण्यात आलीय असेही त्यांनी सांगितले.