परमबीर सिंह यांची एनआयए चौकशी का करत नाही?
मुंबई : पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची तक्रार तत्कालीन मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडे केली. यामुळे वाझे हे कोणाच्या जवळचे होते हे लक्षात येते. तर परमबीर सिंह यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेने चौकशी का केली नाही असा सवाल कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारला.
सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझे प्रकरणावर एनआयएला प्रश्न विचारले. सचिन वाझे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात परमबीर सिंह यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांच्या सोबत अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते. वाझेनी ही बाब इतर अधिकाऱ्यांना सोडून सिंह यांनाच सांगितली. त्यामुळे वाझे हे कोणाच्या जवळचे होते हे लक्षात येत. तसेच वाझे यांचे कार्यालय परमबीर सिंह यांच्या कार्यालयाजवळ आहे. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली इनोव्हा गाडी सुद्धा सिंह यांच्या कार्यालयातील होती. तसेच वाझे हे सतत सिंह यांना भेटत होते. यामुळे वाझे हे कोणाच्या संपर्कात होते आणि कोणाच्या जवळचे आहेत हे लक्षात येते. असे असतांना एनआयए या प्रकरणात परमबीर सिंह यांची चौकशी का करत नाही, सिंह यांची चौकशी का टाळण्यात येत आहे? सिंह यांची अटक टाळण्यात येत आहे का? वाझे सारखा एक अधिकारी हे प्रकरण करू शकत नाही. अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवण्यापूर्वी कोणाला भटले होते? असे सवाल सुद्धा सावंत यांनी उपस्थित केले.
गिरे तोभी टांग उपर
रश्मी शुक्ला प्रकरणात भाजपची अवस्था गिरे तोभी टांग उपर अशी झाली आहे. शुक्ला या भाजपसाठी काम करत होत्या हे आता स्पष्ट झाले आहे. त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला आहे. त्याबद्दल शुक्ला यांनी माफी मागितली आहे. मग भाजप त्यांची का बाजू घेत आहे. असा प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला. परमबीर सिंह यांची चौकशी होऊ नये म्हणून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी भाजप प्रयत्न करत असल्याचे सावंत यांनी सांगितले.