विवेक अग्निहोत्रींचा ‘काश्मीर फाईल्स’ पुन्हा चर्चेत का आलाय?

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

गेल्या वर्षी आलेला काश्मीर फाईल्स हा चित्रपट तुफान गाजला होता. ऋषीमुनींच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेली भूमी म्हणून काश्मीरची ख्याती. पृथ्वीवरचा स्वर्ग असे नावाजले जाणाऱ्या अशा या काश्मिरात नव्वदच्या दशकात अराजकतेचे युग आणले. काश्मिरी पंडितांना अनन्वित अत्याचाराला सामोरे जावे लागले.

धार्मिक दहशतवाद्यांकडून क्रूर नरसंहार करण्यात आला. त्यामुळे पंडितांना काश्मीरमधून पलायन करावे लागले. यावर विवेक अग्निहोत्री यांचा काश्मीर फाइल्स हा सिनेमा होता.

त्यावेळी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या चित्रपटाची जाहिरात करत होते. त्यामुळे हा चित्रपट वास्तवादी नसून कोणत्यातरी पक्षाच्या राजकीय फायद्यासाठी बनवण्यात आल्याचे आरोप झाले. मात्र, असे असले तरी या चित्रपटाला तुफान यश मिळाले. या चित्रपटाने २५० कोटींचा व्यवसाय केला होता.

गोव्यात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची काल सांगता झाली. वेगवेगळ्या चित्रपटांचं या महोत्सवात स्क्रीनिंग झालं. मातब्बर कलाकार या सोहळ्याला उपस्थित होते. तसेच इतरही देशातील प्रतिष्ठित कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. वेगवेगळ्या कलाकारांनी या मंचावर त्यांचं मनोगत आणि चित्रपटसृष्टीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

या महोत्सवातील ज्युरी हेड आणि इस्रायली चित्रपट निर्माते नादव लॅपिड यांनीही महोत्सवात मनोगत व्यक्त करताना विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मिर फाइल्स’वर निशाणा साधला. या चित्रपटामुळे बरेच वादही निर्माण झाले असले तरी यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा हा पहिला हिंदी चित्रपट होता.

नादव लॅपिड म्हणाले की ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटाने आम्हा सर्वांना व्यथित केले आणि आम्हाला प्रचंड धक्का बसला. अशा प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवाच्या कलात्मक आणि स्पर्धात्मक विभागासाठी हा चित्रपट अतिशय अयोग्य आणि विकृत वाटला.माझ्या या चित्रपटाविषयी असणाऱ्या भावना मी उघडपणे मांडतोय कारण,इतक्या प्रतिष्ठित महोत्सवात अश्या प्रकारच्या कठोर टीका या व्हायलाच हव्यात.

लॅपिड यांच्या या वक्तव्यानंतर आता सिनेजगतातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. जेष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी लाखो लोकांच्या झालेल्या हत्याकांडाला जर नादव लॅपिड प्रोपोगेंडा म्हणत असतील तर मी सिद्धिविनायकाकडे या अशा लोकांना सद्बुद्धी लाभो अशी प्रार्थना करतो असे म्हणत लॅपिड यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *