|

पुण्यामधील पूलाला ‘म्हात्रे पूल’ नाव का पडलं?

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

इतिहासात असे बरेच उदाहरणं आहेत ज्यांनी देशासाठी योगदान दिले मात्र त्यांना मरणानंतर उपेक्षाच सहन करावी लागते. मकबूल भट्ट तुमच्या लक्षात असेलच…रविंद्र म्हात्रे हे नाव तुम्हाला आठवतंय का? कोण होते रविंद्र म्हात्रे? त्यांनी देशासाठी कशाप्रकारे बलिदान दिले? मकबूल भट्ट आणि रविंद्र यांचे संबंध काय होते? पुण्यामध्ये रविंद्र म्हात्रे यांच्या नावाने एक पुल सुद्धा बनवण्यात आलेला आहे आणि विक्रोळीत एक मैदान आहे. म्हात्रे पुलावरून जाणाऱ्या हजारो लोकांना किंवा म्हात्रे ग्राऊंड वर खेळणाऱ्या मुलांना जर तुम्ही विचारले तर म्हात्रे कोण होते तर याबद्दल फार लोकं सांगू शकणार नाहीत, म्हणून तर मग आपण जाणून घेऊया कोण आहेत हे रवींद्र म्हात्रे.

तर १९३६ साली जन्मलेले रविंद्र हरेश्वर म्हात्रे इंग्लंडमध्ये भारताचे राजनैतिक अधिकारी होते. बर्मिंघम कॉन्सुलेट जनरलचे प्रभारी उपायुक्त बलदेव कोहली तत्कालीन उच्चायुक्त डॉ. सईद मोहम्मद यांच्या निवृत्ती निरोप समारंभामुळे लंडन येथे होते त्यांच्या अनुपस्थितीत सह-उच्चायुक्त म्हात्रे हे कार्यालयाचे प्रभारी होते. ४ फेब्रुवारी १९८४ मध्ये नेहमीप्रमाणे संध्याकाळी ५ वाजता ते कार्यालयातून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या बार्टल ग्रीन भागात घरासाठी निघाले. दुसर्‍या दिवशी त्याची मुलगी आशाचा १४ वा वाढदिवस होता. तर, वाटेत केक घेऊन घरासमोर बसमधून खाली उतरताच ब्रिटनमध्ये कार्यरत जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटच्या सहयोगी जम्मू-काश्मीर लिबरेशन आर्मीच्या दहशतवाद्यांनी त्यांना बंदुकीच्या धाकाने त्यांच्या गाडीत बसवून अपहरण केले. बर्मिंघममध्ये त्यांचे अपहरण केले तेव्हा भारतीय राजदूत रवींद्र म्हात्रे ४९ वर्षाचे  होते.

रात्री उशिरापर्यंत घरी नं पोहचल्यामुळे त्यांच्या पत्नी डॉ. सोभा पठारे-म्हात्रे अस्वस्थ होऊ लागल्या. त्यांनी म्हात्रे यांच्या ऑफिस मध्ये फोन केला पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर कोहली यांना फोन करून विचारणा केली, त्यांनाही याची कल्पना नव्हती त्यामुळे त्यांनी तात्काळ बर्मिंघम पोलिसांना माहिती दिली. मात्र दुसऱ्याच दिवशी शनिवारी सकाळी जम्मू-काश्मीर लिबरेशन आर्मीच्या वृत्तसंस्था रॉयटर्सच्या कार्यालयात, अज्ञात व्यक्तीने मोडक्या तोडक्या इंग्रजीतून एक पत्र टाकले. ज्या पत्रामध्ये म्हात्रे यांचे अपहरण केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र त्या पत्रावर नाव, पत्ता किंवा फोन नंबर नव्हता, म्हणून रॉयटर्सच्या संपादकाने ही बातमी चालवण्यापूर्वी स्कॉटलंड यार्डला कळविले. जेथे म्हात्रे बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती.

या पत्राद्वारे, जम्मू काश्मिर लिबरेशन फ्रंट ह्या संघटनेने या अपहरणाची जबाबदारी घेतली आणि एक मिलियन पौंड आणि भारतातल्या तुरुंगात असलेल्या मकबूल भट्ट ह्या अतिरेक्याला सोडून द्यावं अशी मागणी केली. मकबूल भट्ट काश्मिरी अतिरेकी होता ज्याचा १९७१ च्या लाहोर विमान अपहरण प्रकरणात हात होता. तसेच १९६६ साली चकमकीत पोलीस अधिकाऱ्याच्या मृत्यूला कारणीभूत झाल्याचा आरोप होता.  १९७६ साली मकबूल भट्ट पकडला गेला आणि त्याला फाशीची शिक्षा सुनावलेली होती.

मकबूल भट्ट ने दयेची याचना करणारा अर्ज केलेला होता मात्र तो फेटाळण्यात आला होता. या घटनेची माहिती भारतालाही दिली गेली. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी रोमेश भंडारी आणि परराष्ट्र सचिव एम.के. रसगोत्रा ​​यांनी गुवाहाटी बाहेर गेलेल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचे विमान आकाशात होते. आयबीएन आणि रॉचे प्रमुख आर.एन. कोव्ह आणि प्रधान सचिव पी.सी. अलेक्झांडर यांना माहिती देण्यात आली. सायंकाळी चार वाजता पंतप्रधानांचे विमान उतरताच त्यांना याची माहिती देण्यात आली.

दहशतवादाचे आश्रयस्थान असलेल्या सुवर्ण मंदिरात सैन्य पाठविण्याचे धाडस करणाऱ्या इंदिरा यांनी दहशतवाद्यांसमोर नमते घेण्यास नकार दिला. इंदिरा गांधी म्हणाल्या की मकबूलला सोडले जाणार नाही आणि भारत दहशतवाद्यांशी कोणतीही चर्चा करणार नाही तसेच अतिरेक्यांशी कोणत्याही प्रकारच्या वाटाघाटी करणार नाही हे ही स्पष्ट केले. याचा परिणाम म्हणून ६ फेब्रुवारी रोजी दहशतवाद्यांनी म्हात्रे यांना ठार मारले आणि बर्मिंगहॅम शहरापासून ४०  किलोमीटर अंतरावर असलेल्या लेस्टरशायरमधील हिंकले येथे महामार्गाच्या बाजूला मृतदेह फेकला. म्हात्रे यांच्या डोक्यात दोन गोळ्या झाडल्या होत्या.

आणि त्याचदिवशी, इंदिरा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलवण्यात आली, ज्यामध्ये विद्यमान राष्ट्रपती ज्ञानी झेल सिंग, प्रणव मुखर्जी (अर्थमंत्री), प्रकाशचंद्र सेठी (गृहमंत्री) आर वेंकटरामन (संरक्षण मंत्री) आणि पी.व्ही. नरसिंहराव (परराष्ट्रमंत्री) उपस्थित होते. मकबूलची दया याचिका फेटाळून लावण्यासाठी अध्यक्ष ज्ञानी झेल सिंग यांना मंत्रिमंडळाने शिफारस केली, जेणेकरुन त्यांना लवकरात लवकर फाशी देण्यात येईल. राष्ट्रपती कोलकात्यात होते. तर एक अधिकारी त्यांच्याकडे मंत्रिमंडळाचा प्रस्ताव घेऊन गेला आणि ज्ञानी झेल सिंग यांनी ताबडतोब दया याचिका फेटाळली. म्हात्रे यांच्या हत्येच्या ११ दिवसानंतर ११ फेब्रुवारी १९८४ रोजी मकबूल भट्ट याला तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली आणि त्याचा मृतदेह तुरुंगातच एका अज्ञात ठिकाणी पुरला गेला. त्यानंतर काही महिन्यात घडलेली आणखी एक गंभीर घटना म्हणजे, ४ नोव्हेंबर १९८४  रोजी JKLF च्या अतिरेक्यांनी मक़बूल भट्ट ला फाशी जाहीर करणाऱ्या नीलकंठ गंजू नावाच्या जज चा खूण केला होता.

त्यावेळची वर्तमानपत्रे वाचली तर रविंद्र म्हात्रे अपहरण व मृत्युनंतर इंदिरा गांधीनाही प्रचंड टीका सहन करावी लागलेली पण अतिरेक्यांना सोडणार नाही ह्या भूमिकेवर त्या ठाम राहिल्या. रवींद्र म्हात्रे राजनैतिक अधिकारी होते, त्यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर झालेला आघात भरून येणारा नव्हता, पण त्यावेळी इंदिरा गांधीनी देशाच्या सुरक्षेला महत्व दिले. सैन्याच मनोबल वाढवायला लष्करी नेतृत्व आणि राजकीय नेतृत्व कसं असावं हे इंदिरा गांधीं आणि तत्कालीन लष्कर प्रमुखांनी वेळोवेळी दाखवून दिलं आहे. इंदिरा गांधीना त्यावेळेला जनतेच्या प्रश्नांना तोंड द्यावे लागले होते आणि त्यांनी जाहीरपणे त्याची उत्तरं देखील दिली होती.

इंदिराजींच्या माहित होते की, म्हात्रे यांनी आपल्यामुळेच जीव गमावला होता, परंतु राष्ट्रीय हितासाठी मकबूलला न सोडण्याचा निर्णय घेतला होता. रवींद्र म्हात्रे यांचे वृध्द आई वडील मुंबईत ३ खोल्याच्या छोट्या घरात विक्रोळीला रहात. पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी या म्हात्रेंच्या आईवडिलांना भेटायला मुंबईला आल्या होत्या. पंतप्रधानांना पाहून ७५ वर्षीय वडील हरेश्वर म्हात्रे आणि ७४ वर्षीय आई ताराबाई खूप रडल्या. इंदिराजीनी त्यांचा हात हातात घेऊन सांत्वन केले. इंदिरा गांधींनी स्पष्ट सांगितले की, “मी स्वत: एक आई आहे, त्यामुळे मी तुमच्या वेदना समजू शकते. माझ्यामुळे तुमच्या मुलाचा जीव गेला, परंतु माझ्यासाठी राष्ट्रीय हित सर्वश्रेष्ठ होते यासाठी रवींद्रने आपला जीव गमावला. मी आपली वैयक्तिक दृष्ट्या अपराधी आहे आणि तुमची माफी मागते”.

अशाप्रकारे देशासाठी वीरमरण पत्करणाऱ्या रवींद्र म्हात्रे यांच्या स्मरणार्थ, त्यांचे नाव पुण्यातल्या पुलाला देण्याचा ठराव पुणे महापालिकेने केला. या पुलामुळे कर्वे रस्ता आणि सिंहगड रस्ता यांना पर्याय मिळाला आणि आसपासचा परिसर आणखी जवळ आला आहे. तेव्हापासून हा पूल ‘म्हात्रे पूल’ म्हणून ओळखला जातो.  याखेरीज मुंबईच्या विक्रोळी येथे त्यांच्या नावावर बीएमसी मैदान देखील आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *