आमच्या वेळीही विधानसभा हादरवून का सोडली नाहीत?
नाईक कुटूंबाचा विरोधीपक्ष नेत्यांना सवाल
मुंबई: वास्तुविशारद अन्वय नाईक यांनी २०१८ मध्ये सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली होती. त्यावेळी सत्तेत असणाऱ्या आताच्या विरोधीपक्षाने का आवाज उठविला नाही असा प्रश्न अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांच्या वतीने विचारण्यात येत आहे.
५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील कावीर गावातील राहत्या घरी आत्महत्या केली. तिथेच त्यांच्या आई कुमूद नाईक यांचाही मृतदेह आढळला होता. अन्वय नाईक हे पेशाने वास्तुविशारद होते. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते.
अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामींचं नाव असल्याचा दावा करण्यात आला होता. शिवाय, अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनीही हा आरोप होता. अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला आणि त्यांना आत्महत्येला जबाबदार धरलं होतं. हे तेच प्रकरण ज्यात अर्णब गोस्वामींना अटक झाली होती.
आता पुन्हा हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलंय. अद्याप न्याय न मिळाल्याचे सांगत नाईक कुटुंबीयांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विरोधकांवर संताप व्यक्त केलाय. फडणवीस यांनी मनसुख हिरेन प्रकरणात सरकारला कोंडीत पकडून संपूर्ण विधानसभा हादरवून सोडली. मग अशीच भूमिका अन्वय नाईक प्रकरणात त्यांनी का घेतली नाही ? फडणवीसांना गुप्तचर यंत्रणांकडून सीडीआर मिळतो मग तसा आम्हाला का मिळाला नाही?, असे प्रश्नावर प्रश्न नाईक कुटुंबीयांनी उपस्थित केले आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अजूनही आम्हाला न्याय मिळाला नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस आणि विरोधकांवर आपली नाराजी व्यक्त केलीये. आशियातील श्रीमंत व्यक्तीला जेवढ्या वेगाने न्याय मिळतो, तसाच न्याय आमच्यासारख्या सामान्य माणसांना कधी मिळणारच नाही का, असा उद्विग्न सवालही नाईक यांच्या पत्नीने विचारलाय.