शिक्षक पदवीधर निवडणुकीत कोण मारणार बाजी; अशी असतील निवडणुकीची गणितं

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

सर्व प्रथम आपण, हायव्होल्टेज ठरलेल्या आणि अगदी शेवटच्या क्षणी आपल्या मामा ला आव्हान देणाऱ्या सत्यजीत तांबे हे ज्या नाशिक मतदारसंघातून उभे आहेत त्याबाबद्दल जाणून घेऊयात

नाशिक पदवीधर मतदारसंघ:
हा तसा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ. गेले तीन टर्म काँग्रेसचे मात्तबर नेते असलेल्या बाळासाहेब थोरातांचे दाजी सुधीर तांबे हे येथून आमदार होते. यावेळीदेखील पुन्हा त्यांनाच तिकीट देण्यात आले होते. मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी सुधीर तांबेंचे पुत्र सत्यजित तांबेंनी अपक्ष म्हणून अर्ज भरला.

काँग्रेसचा AB फॉर्म आपल्याला मिळाला नाही त्यामुळे अपक्ष फॉर्म भरावा लागला तसेच आपण महाविकासआघाडीचेच उमेदवार आहोत असे देखील त्यांनी स्पष्ट केले. नाशिकमध्ये भाजपचा किंवा भाजप पुरस्कृत म्हणून कुणी अधिकृत उमेदवार मैदानात नाही. त्यामुळे नाशिकमध्ये सध्या पॉवरफुल उमेदवार म्हणून सत्यजित तांबेंकडेच पाहिलं जात आहे.

नगर जिल्ह्यातील थोरातांचे पारंपरिक विरोधक असलेल्या विखे-पाटलांनी सत्यजित तांबे भाजपच्या उमेदवारीवर लढले तर स्वागतच आहे असे वक्तव्य केल्याने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता अपक्ष फॉर्म भरल्याने सत्यजित तांबे यांचा विधिमंडळाचा मार्ग हा मोकळा झाला आहे. त्यांच्या व्यतिरिक्त धनराज विसपुते (अपक्ष) आणि धनंजय जाधव (अपक्ष) हे ही रिंगणात आहेत. त्यामुळे नाशिक पदवीधरमध्ये तीनही उमेदवार अपक्षच मैदानात आहेत.

सत्यजीत यांच्या राजकारणातील महत्वकांक्षा लपून राहिलेल्या नाहीत. २०१७ साली झालेल्या शिक्षक पदवीधरसाठी देखील ते इच्छुक होते. मात्र, मामा बाळासाहेब थोरातांनी सत्यजीत यांच्या नावाऐवजी त्यांच्या वडिलांच्या म्हणजेच सुधीर तांबे यांच्या पारड्यात आपले वजन टाकले होते. त्यामुळे यावेळी सत्यजीत हे डायरेक्ट दिल्लीत संपर्क ठेवून होते. मात्र, तरीही त्यांच्या पदरी निराशाच पडली आणि यातूनच त्यांनी अपक्ष उभे राहण्याचा निर्णय घेतला असे बोलले जात आहे.

अमरावती शिक्षक मतदारसंघ:
महाविकास आघाडीमध्ये अमरावतीची जागा काँग्रेसला सोडण्यात आली. विदर्भात सहसा काँग्रेस विरुद्ध भाजपची अशीच लढत पाहायला मिळते. काँग्रेसकडून धीरज लिंगाडे आणि त्यांच्याविरोधात भाजपचे विद्यमान आमदार रणजित पाटील असा सामना रंगणार आहे. विशेष म्हणजे धीरज लिंगाडे यांनी 10 जानेवारीला शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

अमरावती पदवीधरसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दीड वर्षांपूर्वीच तयारी सुरु केली होती. आणि त्यादृष्टीने लिंगाडे यांनी निवडणुकीसाठी तयारी देखील केली होती. परंतु ही जागा काँग्रेसकडे गेल्याने धीरज लिंगाडे हे काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत.

नागपूर मतदार संघ:
महाविकासआघाडीचे गट पक्ष असणाऱ्या शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाला नागपूरची जागा मिळाली आहे. नागपूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने गंगाधर नाकाडे यांना मैदानात उतरवलं आहे.

गंगाधर नाकाडे हे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नागपूर विभाग अध्यक्ष आहेत. नाकाडे यांच्या विरोधात विद्यमान आमदार नागो गाणार यांचे आव्हान असणार आहे,आणि त्यांना भाजपने पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे या निमित्ताने एकप्रकारे सत्तांतरानंतर पहिल्यांदाच शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगेल.

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ:
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ हा तसा राष्ट्रवादीचा गड. अनेक वर्षे त्यांचाच उमेदवार निवडून येतो आहे. विक्रम काळे यांना पुन्हा एकदा राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आणि मोठे शक्तीप्रदर्शन करत त्यांचा अर्ज भरण्यात आला. या वेळी राज्याचे विरोधीपक्षनेते आणि राष्ट्रवादीचे मात्तबर नेते अजित पवार उपस्थित राहिले होते.

मविआचा पाठिंबा म्हणून सेनेचे नेतेही त्यावेळी दिसून आले. अंबादास दानवे, चंद्रकांत खैरेही उपस्थित होते. दुसरीकडे राष्ट्रवादीला शह द्यायला भाजपने आयात उमेदवार रिंगणात उतरवलाय. विक्रम काळेंच्या विरोधात काँग्रेसमधून भाजपत आलेले किरण पाटील मैदानात आहेत.

कोकण शिक्षक मतदारसंघ
कोकणात बाळाराम पाटील हे शेकापचे विद्यमान आमदार आहेत, त्यांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे आणि महाविकास आघाडीनेही त्यांना पाठिंबा दिला आहे. पाटलांविरोधात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे अशी लढत होणार आहे. खरं तर कोकणातली जागा ही शिंदे गटाला जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता, मात्र ज्ञानेश्वर म्हात्रे हे शिंदे गटाचेच अशी सारवासारव भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

म्हात्रेंचा अर्ज दाखल करताना शिंदे गटाचेही मंत्री उपस्थित होते. भाजपचे नेते आणि मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासोबतच, मंत्री उदय सामंत, आणि मंत्री दीपक केसरकर अर्ज दाखल करण्यावेळी उपस्थित होते.

आता या पाचही मतदारसंघात नेमकं कोण बाजी मारणार आणि या निवडणुकीमुळे राज्यातील राजकारणात काही नवीच समीकरणं जुळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *