नाशिक पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा कोणाला? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या नाट्यमय घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कारण, नाशिकचे मावळते आमदार डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. पण, ऐनवेळी पक्षाचा आदेश झुगारून तांबे यांनी पुत्र सत्यजीत तांबेंचा अपक्ष अर्ज दाखल केला. तर, दुसरीकडे अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना उद्धव ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे.

त्यामुळे नाशिकमध्ये सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील, अशी थेट लढत होणार आहे. तसेच या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा कोणाला असेल? या बाबत अजूनही दोन्ही पक्षांकडून भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. याच संदर्भात विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

“नाशिक पदवीधर निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचं बाळासाहेब थोरात आणि नाना पटोलेंशी बोलणं झालं आहे. शरद पवार यांनाही काही नेत्यांशी चर्चा केली आहे. तसेच काँग्रेसने तांबे पिता-पुत्रावर कारवाई केली आहे. त्यामुळे नाशिक पदवीधर मतदार संघात आघाडीचा उमेदवार कोण असेल? याबाबत आम्ही चर्चा सुरू आहे.

काँग्रेसची भूमिका नेमकी काय आहे? त्यानुसारच राष्ट्रवादी काँग्रेस निर्णय घेईल. शुभांगी पाटील यांनाही ठाकरे गटाने पाठिंबा जाहीर केला आहे, याबाबतही उद्यापर्यंत निर्णय होईल”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

डॉ. ताबे यांना अधिकृत तिकीट दिल्यानंतरही त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत अर्ज न भरल्याने हा गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामागे नेमकं काय कारण आहे? याबाबत सुधीर तांबेच स्पष्टपणे सांगू शकतात. सुधीर तांबे हे तीनवेळा आमदार राहिले आहेत, त्यामुळे त्यांनी अर्ज भरायला पाहिजे होता. मात्र, घरात त्यांची काही चर्चा झाली असावी आणि त्यामुळेच सत्यजीत तांबेंनी अर्ज भरला असावा”, असेही ते म्हणाले.

तसेच “यासंदर्भात मला आधीच माहिती मिळाली होती. याबाबत माझं काँग्रेसच्या वरिष्ठांशी बोलणं झालं होतं. त्यांनी मी अधिकृत डमी फॉर्म भरून ठेवायलाही सांगितलं होतं”, अशी माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, महाविकास आघाडीत बिघाडी असल्याचा दावा भाजपाकडून करण्यात येत आहे. याबाबही अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली.

“या घडामोडींमुळे भाजपाला संधी मिळाली आहे. त्यामुळे ते काहीही बोलत आहेत. त्यांच्या बोलण्याला काहीही अर्थ नाही. आम्ही एकत्र बसूनच मार्ग काढला होता. मात्र, काँग्रेसच्या उमेदवाराने अर्ज न भरल्याने हे प्रश्न निर्माण झाले”, असे ते म्हणाले.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *