|

आपल्याच वडिलांना निवडणुकीतून माघार घ्यायला लावणारे सत्यजीत तांबे कोण आहेत?

सत्यजीत तांबे
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

राज्यात थोड्याच दिवसात शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूका होणार आहेत. त्यासाठी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख होती. एकनाथ शिंदेंची बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपा एकत्रित निवडणूक लढवणार आहे तर विरोधक असणाऱ्या महाविकासआघाडीने देखील एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागा महाविकासआघाडीकडून काँग्रेसला देण्यात आली. यानंतर काँग्रेसने उमेदवार म्हणून पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणा केली गेली होती. यानंतरही सुधीर तांबेंनी आपला अर्ज दाखल केला नाही. दुसरीकडे सत्यजीत तांबेंनी याच मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला.

आपल्याच वडिलांना निवडणुकीतून माघार घ्यायला लावणारे सत्यजीत तांबे आहेत तरी कोण?

सत्यजीत तांबे हे महाराष्ट्र काँग्रेसचे मात्तबर नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. तसेच विधानपरिषदेचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे ते पुत्र आहेत. राजकारणचा मोठा वारसा त्यांना असला तरी सत्यजीत यांनी २०००मध्ये काँग्रेस कार्यकर्ता म्हणून तळागाळातील राजकारणापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. २००७ मध्ये वयाच्या अवघ्या २४व्या वर्षी त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवला आणि जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळविणारे सर्वात तरुण सदस्य बनले होते.

या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणा झाली होती. त्यांनी एबी फॉम दिला गेला होता. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून तांबे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. दरम्यान, त्यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती. त्यामुळे काँग्रेसमध्ये उमदेवारी जाहीर करण्यावर पेच निर्माण झाला होता. तसेच भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली होती. काँग्रेसला दे धक्का देण्यासाठी भाजपने तयारी केली होती. मात्र, काँग्रेसने जोरदार सूत्र हलवित तांबे यांच्या घरात उमेदवारी राहिल याची काळजी घेतली.

याबरोबरच, बाळासाहेब थोरातांचे विरोधक असलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांनी नाशिक पदवीधर निवडणूक प्रक्रियेत चमत्कार होऊ शकतो, असं मोठं वक्तव्य केले होते. सत्यजीत तांबे यांनी भाजपची उमेदवारी केली तर स्वागतच आहे, असं विधानही विखे पाटील यांनी केले होते.

काही दिवसांपूर्वी सत्यजीत यांच्या “सिटीजनवील” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला होता. त्या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी फडणवीसांनी बाळासाहेब थोरातांना प्रश्न करत, अजून सत्यजीतला किती दिवस बाहेर ठेवणार आहात? जास्त वेळ बाहेर ठेवू नका नाहीतर आमचे लक्ष त्यांच्याकडे जाईल असा सूचक इशारा देखील दिला होता.

ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता, काँग्रेसमधून डावलले जात असल्यामुळे सत्यजीत तांबे भाजपात जाऊ शकतात या चर्चाना उधाण आले होते. मात्र, वडील सुधीर तांबे यांनी आपली उमेदवारी मागे घेत मुलाला निवडणुकीचे मैदान मोकळे करुन दिले. त्यामुळे शेवटच्या क्षणी अधिकृत एबी फॉर्म उपलब्ध न होऊ शकल्याने सत्यजीत यांनी अपक्ष फॉर्म भरला आहे. तसेच आपणच महाविकासाआघाडीचे उमेदवार आहोत असे देखील त्यांनी जाहीर केले आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *