पवारांचे विश्वासू आणि राष्ट्रवादीचा मुस्लीम चेहरा, कोण आहेत हसन मुश्रीफ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कागल आणि पुण्यातील घरांवर अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने छापेमारी केली. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर ही छापेमारी झाल्याचं सांगण्यात येत आहे. आज सकाळपासून ईडीने आपलं धाडसत्र सुरु केलं.
या धाडसत्राची माहिती मिळाल्यानंतर मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांकडून कागल बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान, या धाडसत्रानंतर किरीट सोमय्या यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन, हसन मुश्रीफांवर हल्लाबोल केला. “हसन मुश्रीफांनी 158 कोटी रुपयांचा घोटाळा केला. उद्धव ठाकरे सरकारमधील आणखी एक माफिया मंत्र्यावर कारवाई होणार आहे.
कोल्हापूरमधल्या महालक्ष्मी मातेने आज मला आशीर्वाद दिला. कोल्हापूरला जायला निघालो असताना उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी मला जाऊ दिलं नाही. आज महालक्ष्मी मातेने आशीर्वाद दिला” असं किरीट सोमय्या म्हणाले.
हसन मुश्रीफ हे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत कागल हा कोल्हापूर जिल्ह्यातील त्यांचा मतदारसंघ आहे. १९९९ पासून सलग ते विधानसभेत कागल मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. ठाकरे सरकारच्या काळात हसन मुश्रीफ यांच्याकडे ग्राम विकास मंत्रिपदाचा कार्यभार देण्यात आला होता.
याबरोबरच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या जवळचे आणि एकनिष्ठ नेते म्हणून मुश्रीफांची ओळख आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बडा मुस्लिम चेहरा. शरद पवारांच्या टीकाकारांना उत्तर देणारा पहिल्या फळीतील नेता अशी देखील त्यांची ओळख आहे.
किरीट सोमय्या यांनी मुश्रीफांवर नेमके काय आरो[प केलेत?
बोगस कंपन्यांद्वारे साखर कारखाना चालवण्याचे कंत्राट घेऊन १५८ कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा मुख्य आरोप सोमय्यांनी मुश्रीफांवर केला आहे. २०२०साली पारदर्शक व्यवहार न होता अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला चालवण्यासाठी दिला गेला.
या कंपनीस साखर कारखाना चालवण्याचा कोणताही अनुभव नसताना, या कंपनीला कंत्राट का दिले? मुश्रीफांचे जावई या कंपनीचे मालक आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला होता. सोमय्या यांनी असेही म्हटले होते की, हसन मुश्रीफ यांनी ग्रामविकास मंत्री असताना १५०० कोटींचे कंत्राट जावयाच्या बनावट कंपनीला दिले.
मी पुरावे दिल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी मुश्रीफांना हे कंत्राट रद्द करण्यास सांगितले. मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अनेक बनावट कंपन्यांच्या माध्यमातून १५८ कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केला, असा आरोप सोमय्यांनी केला आहे. आणि यावरूनच हसन मुश्रीफ अडचणीत आल्याचे चित्र आहे.