पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटला WHO चा दणका

Covishield बाबत महत्त्वाचा निर्णय
पुणे: सध्या भारतात दिल्या जाणाऱ्या दोन कोरोना लशींपैकी एक म्हणजे कोविशिल्ड. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केलेली ही लस. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि ॲस्ट्राझेनका कंपनीच्या मदतीने ही लस तयार करण्यात आलेली आहे. गेले काही दिवस ॲस्ट्राझेनका कंपनीच्या लशीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्हं उपस्थित केले जात आहेत. त्यातच आता जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) कोविशिल्डबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने जागतिक आरोग्य संघटनेकडे कोविशिल्ड लशीची शेल्फ (Covishield shelf life) लाइफ वाढवण्यासाठी अर्ज केला होता. शेल्फ लाइफ म्हणजे लस उत्पादित झाल्यापासून किती काळापर्यंत वापरता येऊ शकते ती मुदत. या कालावधीपुरती लशीचा प्रभाव टिकून राहतो आणि ती वापरण्यासाठी सुरक्षित असते. सध्या कोविशिल्डची शेल्फ लाइफ सहा महिने आहे. ती नऊ महिन्यांपर्यंत वाढवावी, अशी मागणी सीरमने डब्लूएचओकडे केली होती.
पण WHO ने सीरमची ही मागणी फेटाळली आहे. कोविशिल्ड लशीची शेल्फ लाइफ सहा महिन्यांवरून नऊ महिन्यांपर्यंत वाढवण्यास जागतिक आरोग्य संघटनेनं नकार दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. पीटीआयने याबाबत ट्वीट केलं आहे.
अनेक देशांमध्ये ॲस्ट्राझेनकाच्या कोरोना लशीचा वापर तात्पुरता थांबवला आहे. ही लस घेतलेल्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होत असल्याचं दिसून आलं आहे. काही जणांचा यानंतर मृत्यूही झाला आहे. ॲस्ट्राझेनकाची लस आणि रक्ताच्या गुठळ्या होणं यामध्ये संबंध असू शकतो अशी शक्यता युरोपियन वैद्यकीय नियामकांनी वर्तवली आहे. पण तरी या लशीचे दुष्परिणामापेक्षा फायदे अधिक असल्यावरही जोर देण्यात आला आहे. त्यामुळे याबाबत अधिक अभ्यास सुरू आहे.