“उद्धव ठाकरेंच्या हातात राज्य आलंय की त्यांच्यावर राज्य आलंय” : राज ठाकरे

मुंबई: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर पोलिसांनी स्फोटकं ठेवली, ती कोणी आणि कोणाच्या सांगण्यावरून ठेवली आणि का ठेवली हा मुद्दा महत्वाचा आहे. अनिल देशमुख हा मुद्दा महत्वाचा नाही. हा मूळ मुद्दा भरकटू देऊ नका असे सांगत उद्धव ठाकरेंच्या हातात राज्य आलंय की त्यांच्यावर राज्य आलंय असा खोचक सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झूम द्वारे संवाद साधला. त्यात चर्चेत नेमके काय झाले याची माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
परमबीर सिंग ह्यांना १०० कोटींच्या टार्गेटची आठवण त्यांना पोलीस कमिशनर पदावरून हटवलं गेल्यावरच का झाली? आधी का नाही झाली? आणि बार, रेस्टोरंटकडून १०० कोटींचं टार्गेट अनिल देशमुखांकडून दिलं गेलं हा आरोप लांच्छनास्पद असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली.
मनसेतील पदाधिकारी जमील शेख ह्यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रवादीचा पदाधिकारी नजीम मुल्ला ह्याचं नाव आलं आहे. ह्याच पदाधिकाऱ्यांचं नाव सुरज परमार हत्या प्रकरणातही आलं होतं. ह्याप्रकरणी राज्य सरकारने लक्ष घालावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
आम्ही सुद्धा हात बांधून नाही अशा इशारा देत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या नजीम मुल्लाचं नाव आल्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यानीही या प्रकरणाची दखल घ्यावी. असे राजरोसपणे खून पडायला लागले तर ते महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारं नाही. यासंबंधी शरद पवार यांना भेटणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.