“कुमारी मातांनी जावं तरी कुठं?”
एखाद्या स्त्रीचे पुरुषाशी लैंगिक संबंध असल्याचा उघड-उघड पुरावा म्हणजे तिचे मातृत्व! हे मातृत्व जर विवाहानंतर पती-पत्नीच्या संबंधातून असेल तर ते गौरवास्पद आणि तेच विवाह अगोदरचं असेल तर ते मात्र घृणास्पद, गैर आणि अनैतिक ठरतं. आता हे तर लॉजिक साधं-सरळ-सोप्प आहे की पुरुषाच्या सहभागाशिवाय स्त्रीला मातृत्व लाभूच शकत नाही. असं सगळं असतानासुद्धा अनैतिकतेचा शिक्का मात्र पुरूषांवर बसत नाही हा कुठला न्याय?
आज कुठल्याही गर्भपात केंद्रावर आपण जाऊन बघितलं तर अविवाहित मातृत्वाचा प्रश्न किती बिकट आहे व त्याची जाहीर वाच्यता करणं किती अवघड आहे हे लक्षात येईल. कारण हा विषय आई-वडिलांच्या इभ्रतीचा प्रश्न देखील बनलेला असतो. समाज मात्र यात संबंधित असलेल्या मुलावर कुठलेही अनैतिकतेचे आरोप न करता त्या मुलीलाच जबाबदार ठरवत असतो. बऱ्याच मुलींच्या बाबतीत हा प्रकार घडतो आणि याच कारणामुळे त्यांना एकतर मूल सोडून द्यावे लागते किंवा जीवाला धोका असतानाही पाचव्या, सहाव्या महिन्यातसुद्धा गर्भपाताला सामोरं जावं लागतं.एवढच नव्हे तर यासंदर्भात फिर्याद घेऊन न्याय मागायला येणाऱ्या मुलींची संख्या देखील कमीच असते. कारण न्याय मिळणार नाही याची त्यांना खात्री असते.
लग्न ही स्त्रियांच्या आयुष्यातली इतकी महत्त्वाची गोष्ट असते की एकदा अविवाहीत असताना शरीर संबंध झाले असं जाहीर झालं की जन्मभर त्यांचं लग्न होणार नाही ही भीती असते. म्हणून अशा प्रसंगांना सामोरं जाणाऱ्या मुलींना गुपचूपपणे गावाच्या बाहेर किंवा शहरात नेऊन ठेवलं जातं. बाळंतपण झाल्यावर त्या बाळाला अनाथाश्रमात दिलं जातं किंवा दत्तक दिलं जातं. जास्तीत जास्त गर्भपात हे सोळा ते तीस वयाच्या मुलींमध्ये दिसून येतात हे वास्तव आहे. यांत अविवाहित, विधवा, घटस्फोटीत स्त्रियांचा देखील समावेश असतो.
अविवाहित मातृत्वा मागील कारणे आणि परिणाम:-
समाजात स्त्रीला ज्यामुळे चारित्र्यहीन ठरवलं जातं. विशेषतः ज्यामुळे अनेक प्रश्न उभे राहतात ते अविवाहित मातृत्त्व स्त्रिया स्वेच्छेने स्वीकारतात असं म्हणणं नक्कीच मूर्खपणाचं ठरेल. त्यामुळे स्वेच्छेने स्त्रिया विवाहापूर्वी माता बनतात असं सरसकट विधान करणं म्हणजे पुरुषांच्या व्यभिचाराला उघड समंती देणं होय. लैंगिक संबंधाबद्दल स्त्री व पुरुषांत अनभिज्ञता आणि लैंगिक संबंधाबद्दल असणारं विशेष कुतूहल हे याचं मुख्य कारण असल्याचं मीन्स स्टडीज फोरमच्या अभ्यासात दिसून आलं.
संबंध ठेवल्यावर मातृत्व कोणत्या काळात येऊ शकतं, मूल नेमकं कसं व कुठल्या काळात तयार होतं या विषयाबद्दल स्त्रियांना पुरेशी माहिती विवाहापूर्वी नसते. परिणामी ज्यावेळी गर्भ राहिला जातो तेव्हा लक्षात येतं आणि मग अघोरी उपाय करून गर्भ पाडण्याचा प्रयत्न केला जातो मग अशावेळी स्त्रियांना गंभीर इजाही होतात. गर्भ न पडता वाढत राहिला तर मानसिक व शारीरिक दृष्ट्या इजा होऊन अपंग मूल जन्माला येतं. मग अशा वेळी कधीकधी त्या स्त्रीचा मृत्यू देखील ओढवतो.
दुसरं महत्त्वाचं कारण असं की स्त्रिया पुरुषांच्या बळजबरीला, बलात्काराला बळी पडतात. पुष्कळदा हे बलात्कार घरातील नातेवाईक व शेजारच्या कुटूंबीयातील पुरुषांकडून होतात. त्यातही सर्वात जास्त प्रमाण असतं ते घरमालकांनी तरुण किंवा किशोरवयीन मोलकरणीवर केलेल्या बलात्काराचं. आणखी एक महत्त्वाचं कारण निकोप लैंगिक संबंधाचा अभाव.
स्त्री व पुरुषांना परस्परांवरील प्रेमभावना दाखवण्याची मोकळीक या समाजात नसते. दुसरं असं की पुरुषांकडून समाज एकनिष्ठतेची बांधिलकी कधीच मागत नाही. लग्नापूर्वी ठेवलेले संबंध आणि त्याचा परिणाम मातृत्वात दिसला की ते संबंध मान्य न करण्याची त्याची वृत्ती याच विकृत मानसिकतेतून बळावलेली दिसते. भूक भागवायची म्हणून संबंध ठेवायचे मग त्या संबंधाचे कुठलेच दायित्व, जबाबदारी घ्यायची नाही. परिणामी स्त्रीला अविवाहित मातृत्वाला सामोरे जावे लागते.
समाजाने लग्नाआधीच्या मुलाकडे बघून मला जाब विचारला तर मी कसे तोंड देईन या सगळ्याचा बागुलबुवा करण्यात पुरुषप्रधान संस्कृतीची भूमिका महत्त्वाची ठरते. त्यामुळे या संबंधांमध्ये सहभागी असणारा पुरुष स्वतः या संबंधांकडे निकोपपणे न पाहता बाजूला होतो. त्याचा परिणाम असा होतो की त्या मुलाचे संगोपन पालन-पोषण याचा सर्व भार मातेवर पडतो. पर्यायाने तिच्या जन्मदात्या कुटुंबावर पडतो. अविवाहित मातेचे मूल वाढवणे कुटूंबासाठी महाभयंकर पाप असते. म्हणून मग अशा मुलींना सुधारगृहाची वाट दाखवण्यात येते. आपल्या बाळाला वाढवण्याचा निर्णय करून या मुली बाहेर पडतात आणि कुठल्यातरी आश्रमाचा आधार घेतात. अशिक्षित मुली ज्यांना पर्यायच उरत नाही त्या स्वतःहून वेश्याव्यवसायात जातात किंवा आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. तिला फसवणारा, तिची आणि मुलाची जबाबदारी झटकणाऱ्या पुरुष गुन्हेगाराचा मात्र या सगळ्यांत कुठेही उल्लेख केला जात नाही किंवा त्याला सुधारण्याचे कुठलेच मार्ग सरकारी योजनात अस्तित्वात नाहीत. पुरुषांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव असणे आणि महिलांनी अशा घटनांना धीरानं सामोरं जाणे हा खरं तर मानसोपचाराचा एक भाग आहे. त्यामुळे अशा पद्धतीची सल्ला केंद्र किंवा त्यांच्या मानसिक चाचण्या घेण्यासाठीचे मानसोपचार केंद्र उभारलं गेलं पाहिजे हीच काळाची खरी गरज आहे असं म्हणायला हरकत नाही.