|

MPSC आंदोलनात गोपीचंद पडळकर आले कुठून?

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

दोन दिवसांपूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा अचानक पुढे ढकलल्यामुळे पुण्यात उत्स्फूर्तपणे हजारो विद्यार्थी रस्त्यावर आले. रास्ता रोको करत आंदोलने केली. शासनाला या आंदोलनाची दखल घ्यावी लागली. विद्यार्थी एकजुटीपुढे शासन नरमले आणि एका आठवड्यातच परीक्षा घ्यायचे जाहीर केले. या आंदोलनाचा चेहरा गोपीचंद पडळकर होते त्यांनी दिवसभर हा मुद्दा चांगलाच गाजवला. अनेकांना प्रश्न पडला की ‘पडळकर तिथे कसे?’

दि. ११ मार्च हा महाशिवरात्रीचा दिवस होता. साधारण दुपारी दीड वाजेच्या सुमारास आयोगाचा दि. १४ मार्च रोजी होणारी परीक्षा रद्द होणार आणि यथावकाश ही परीक्षा घेऊ या आशयाचा निर्णय आला. या निर्णयानंतर अवघ्या अर्ध्या पाऊण तासात आमदार गोपीचंद पडळकर हे पुण्यातील नवी पेठेत शास्त्री रस्त्यावर कसे पोहोचले? गोपीचंद पडळकर अचानक विद्यार्थ्यांमध्ये अवतरले कसे? या आंदोलनातील पडळकरांच्या उपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी हा राजकीय दृष्ट्या सजग असतो त्याला राजकीय समज असते. पुण्यात अशा तरुण तरुणींची संख्या सुमारे दोन लाखाच्या आसपास आहे. महाराष्ट्रातली विविध जिल्ह्यातून अभ्यासासाठी विद्यार्थी पुण्यात येतात. ज्यांना राजकीय समज आहे अशा गटाला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न विविध राजकीय गट करत असतातच.

आमदार रोहित पवार यांनी या गटाचे महत्त्व चांगले ओळखले आहे. या विद्यार्थ्यांच्या माध्यामातून संपूर्ण महाराष्ट्र भर आपला जनसंपर्क उभा राहू शकतो याची यशस्वी चाचणीही त्यांनी घेतली आहे. MPSC करणार्‍या विद्यार्थ्यांचे संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. चर्चासत्र, मेळावे, संमेलन आयोजित केले.

लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना मदत करण्यात रोहीत पवार आणि त्यांचे सहकारी आघाडीवर होते. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुला-मुलींना आपल्या प्रश्नाची सोडवणूक रोहीत दादा करतील असा विश्वास होता. आपल्या बद्दलचा सद्भाव विद्यार्थी वर्गाला पेरण्यात रोहीत पवार आणि त्यांची सहकारी यशस्वी झाले.

रोहीत पवारांसोबतच ‘अपना भिडू, बच्चू कडू’ यांचाही चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्याचा बच्चू भाऊ हा जवळचा पर्याय आजही अनेक विद्यार्थ्यांना वाटतो. बच्चुभाऊ यांचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते सचिन ढवळे हे सध्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय शिक्षक आहेत .त्यांच्या सेमिनार, क्लासला हजारो विद्यार्थी येतात. ढवळे सरांनी मागच्या वर्षी मराठवाड्यातून पदवीधरची निवडणूक बच्चुभाऊ यांच्या प्रहार पक्षाकडून लढवली आहे.  बच्चुभाऊ यांचाही गट स्पर्धा परीक्षा करणाऱ्यात लोकप्रिय आहे.    

स्पर्धा परीक्षेचे हब असणाऱ्या कसब्याचे खासदार गिरीश बापट हे कसब्याचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनीही काही वर्षापूर्वी विद्यार्थ्यांसाठी माफक दरात भोजन देण्याची सोय केली होती. धीरज घाटे यांचाही या क्षेत्रातील विद्यार्थ्यांशी संपर्क आहे पण रोहित पवार किंवा बच्चू भाऊ कडू यांच्याएवढा संपर्क नाही. आता प्रश्न असा पडतो की या सगळया पिक्चर मधे ‘आमदार गोपीचंद पडळकर’ आले कुठून?

तर झाली गोष्ट अशी ज्या दिवशी म्हणजे ११ मार्चला शासनाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला नेमकं त्याच दिवशी पडळकर पुण्यात होते. पुण्यातील पत्रकार भवनाच्या सभागृहात विकास लांबोरे यांच्या ‘भोंबाडातला डोंगाळा’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होते. भोंबाडातला डोंगाळा म्हणजे मुंगळा. हा प्रकाशन समारंभ ११ वाजता सुरू झाला आणि दोन वाजता संपला. कार्यक्रम संपल्या बरोबर परीक्षा रद्द झाल्याची बातमी सभागृहात येऊन धडकली. पडळकर हे चाणाक्ष राजकारणी आहेत त्यांनी या विषयाचे मूल्य हेरले. तिथून हाकेच्या अंतरावर असणार्‍या अहिल्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या अभ्यासिके समोर ते अवघ्या काही मिनटात दाखल झाले.

पत्रकार भवन ते अहिल्या अभ्यासिका हा अर्ध्या किलोमीटरचा प्रवास त्यांनी पायी केला. या एवढ्याशा अंतरात विद्यार्थी पडळकरां सोबत चालू लागले. घोषणांनी शास्त्री रस्ता दणाणून गेला आणि पुढे काय झाले हे आपण सर्वांनी पाहिले. पुढचे सुमारे दहा तास एक हाती हे आंदोलन पडळकरांकडे  होते.

विद्यार्थ्यांचे जे यशस्वी आंदोलन झाले त्याचे मोठ्या प्रमाणात श्रेय गोपीचंद पडळकर यांना जाते. त्यांनी आक्रमकपणे हा मुद्दा मांडल्याने हा विषय जोमाने पुढे गेला हे नाकारता येणार नाही.

पडळकर तिथे नसते तर आंदोलन निराळ्या दिशेने गेले असते का? त्याचा योग्य तो परिणाम शासनावर झाला असता का? याचा विचार सुज्ञांनी केला पाहिजे.

या आंदोलनामुळे पडळकरांच्या रुपाने MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांची वोटबँक प्रभावित करु शकेल असा नेता भारतीय जनता पार्टीला मिळाला आहे.

ता.क.

‘जे विद्यार्थी सिलेक्ट झाले आहेत त्यांना नियुक्ती द्या नाहीतर मुंबईत आंदोलन करू’ असे  पडळकरांनी आजच पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *