वेळ आली की सगळी माहिती उघड करू
मुंबई: राज्यात सध्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे खळबळ माजली आहे. परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून केलेल्या आरोपानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून अनिल देशमुखांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीने सावध भूमिका घेतलीये.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आता या संपूर्ण प्रकरणावर मीडियाशी संवाद साधताना मोठं विधान केलं आहे. परमबीर सिंग यांनी पाठवलेल्या पत्रामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यातून बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत. बदली झाल्यानंतर त्यांनी पत्र लिहिल्याने अनेक शंका निर्माण झालेल्या आहेत. १७ मार्च रोजी बदली होणार हे त्यांना माहीत होतं. त्यामुळे १६ मार्च रोजी त्यांनी प्रश्न विचारून त्यांचे चॅटचे पुरावे तयार केले. परमबीर सिंह दिल्लीत कुणाला भेटले होते, याची माहिती आमच्याकडे असून वेळ आल्यावर ती उघड केली जाईल, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. परमबीर सिंह यांनी कट कारस्थान केलं आहे. दिल्लीहून आल्यानंतर सिंह यांनी हे पत्र लिहिलं. दिल्लीत ते कुणाला भेटले? कधी भेटले? काय चर्चा केली? त्याची माहिती आमच्याकडे आहे. वेळी आली तर ही संपूर्ण माहिती उघड करू,असा इशारा मलिक यांनी दिला आहे.
देशमुख फेब्रुवारीमध्ये वाझेंना भेटल्याचा उल्लेख त्या पत्रात आहे. देशमुख हे विदर्भ दौऱ्यावर असताना कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर २७ फेब्रुवारीपर्यंत ते होम आयसोलेटेड होते. २७ तारखेला त्यांचा कोरोना रिपोर्ट आल्यानंतर ते निगेटिव्ह आले. त्यानंतर फेब्रुवारीच्या महिन्यात ते एकच दिवस लोकांना भेटले. त्यामुळे सिंग यांनी पुरावे गोळा करण्याचा कट केलेला दिसतो. मात्र, सिंग यांचे आरोप गंभीर आहेत. त्याची चौकशी करून कारवाई केली जाणार आहे, असंही नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.