इंदिरा गांधीं जेंव्हा महाराष्ट्रात महिला काँग्रेस पार्टी मजबूत करण्याची जबाबदारी प्रतिभाताईंवर सोपवतात…

प्रतिभाताईंचा राजकारणातील प्रवास काट्याकुट्यांतून जाणारा होता. या काट्यांवर चालून त्यांनी असा आदर्श निर्माण केला ज्याचा आज परिणाम दिसत आहे. प्रतिभाताईंनी जेव्हा राजकारणात प्रवेश केला तेव्हा स्त्रियांचे घराबाहेर निघणे सुद्धा अवघड होते. स्त्रियांचे विश्व चूल आणि मूल ह्याच कक्षेत होते. परंतु प्रतिभा या तर प्रतिभाच होत्या! हार मानने त्यांना माहीतच नव्हते. शाळेपासून कॉलेज पर्यंत त्यांनी यश नेहमीच खेचून आणले. राजकीय जीवनाच्या प्रारंभी वसंतराव नाईक, मधुकरराव चौधरी अशा नेत्यांनी प्रतिभांच्या प्रतिभेला ओळखले आणि राजकारणात त्यांना पुढे जाण्याची प्रेरणा दिली.
भव्य आणि उठावदार व्यक्तिमत्वाऐवजी साधारण सामान्य प्रतिभा पाटील यांचे ‘प्रथम महिला राष्ट्रपती’च्या रूपात आपल्या समोर येणे हे भारताच्या इतिहासातील विशेष महत्त्वाची घटना आहे.
राजकारणात आल्यापासून प्रतिभाताईंचे गांधी कुटुंबाशी घनिष्ठ संबंध होते. १९६२ मध्ये निवडणूक जिंकल्यावर त्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आल्या. ज्यामध्ये प्रामुख्याने इंदिरा गांधी होत्या. प्रतिभाताई इंदिरा गांधींच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झाल्या होत्या. इंदिरा गांधींनी ज्या पद्धतीने स्वतःची वेगळी ओळख प्रस्थापित केली. ते बघून प्रतिभाताई त्यांच्या चाहत्या बनल्या. वेळ मिळताच त्या प्रत्यक्ष भेट, पत्र, फोन अशा माध्यमातून इंदिरा गांधींच्या संपर्कात राहत असायच्या. इंदिरा गांधी सुद्धा प्रतिभा पाटलांच्या सक्रियतेमुळे खूश होत्या. त्यांना ह्या गोष्टीचा जास्त आनंद वाटे की प्रतिभाताई राजकारणा बरोबर स्वतःच्या सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत.
काँग्रेसचे जुने सदस्य सांगतात की, इंदिरा गांधीही प्रतिभाताई मुळे प्रभावित होत्या. महाराष्ट्रात पार्टी मजबूत करण्याची आणि महिलांचे समर्थन मिळविण्याची जबाबदारी इंदिरा गांधींनी प्रतिभाताईवर सोपवली होती. प्रतिभाताईंनी पूर्ण कौशल्याने आपले काम पार पाडले. प्रादेशिक स्तरावर दिली गेलेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी मनापासून पार पडली. आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. राजकारणात उत्कर्ष होऊ लागला की, इतरांची इर्षा सहन करावीच लागते. परंतु प्रतिभाताईंवर याचा काही परिणाम झाला नाही. स्वतःचे काम प्रामाणिकपणे करणे आणि विनाकारण कोणत्याही गोष्टीचे स्तोम माजवू नये ही त्यांची वृत्ती आहे. प्रामाणिकपणा हाच स्वतःचा धर्म म्हणून त्या काम करीत राहिल्या. इंदिरा गांधींच्या संपर्कातही त्या ह्याच भावनेने राहिले आणि शक्य ती सर्व मदत केली.
आणीबाणीनंतर इंदिराजींना जेंव्हा अटक झाली तेव्हा त्यांची साथ देणार्या मोजक्या नेत्यांमध्ये प्रतिभाताई प्रामुख्याने होत्या. इंदिरा गांधीच्या अटकेच्या निषेधार्थ स्वतःला अटक करवून घेतले. ज्या दिवशी इंदिराजींना अटक झाली त्यादिवशी प्रतिभाताईंच्या वाढदिवस होता. १९ नोव्हेंबर १९७७ रोजी स्वतःच्या वाढदिवसाचा विचार न करता प्रतिभाताईंनी तुरुंगात जाणे स्वीकारले. कारण त्यांना इंदिराजींची प्रत्येक पावलागणिक साथ करायची होती. इंदिराजींच्या सुख दुःखात प्रतिभाताईंनी कायम त्यांना साथ दिली होती. प्रतिभाताई तुरुंगात गेल्यावर त्यांचे अनेक विरोधक निर्माण झाले. कारण फार कमी लोकांची इंदिरा गांधींच्या निकटवर्तीयांमध्ये गणना होत असे. त्यामुळे प्रतिभाताई बद्दल अनेकांना ईर्षा वाटे. कारागृहात या दोघींची निकटता आणखी वाढली.
इंदिरा गांधींनी त्यांना काम करण्यास आणि जनतेचा विचार करण्यास प्रोत्साहित केले. लोकांचा उद्धार करायला सांगितले. आपण जनतेचे सेवक आहोत म्हणून ही जनताच आपल्यासाठी सर्वस्व आहे. असे इंदिराजींचे बोल तेव्हा प्रतिभाताईंनी मनात कोरून घेतले. प्रतिभाताई इंदिरा गांधींची प्रत्येक गोष्ट समजून उमजून त्याचा आपल्या कार्यात वापर करीत असत. स्वतःच्या मंत्रिपदाची त्यांना कधीच घमेंड नव्हती. जनतेवरील त्यांच्या भक्तीमुळे त्या वारंवार निवडणूक जिंकून जनतेच्या हृदयावर राज्य करण्यात यशस्वी झाल्या. गांधी कुटुंबाप्रती त्या प्रारंभापासूनच प्रामाणिक होत्या पण ह्या संबंधांचा त्यांनी कधीही दुरुपयोग केला नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे त्यांनी स्वतःची महत्वकांक्षा नेहमी स्वतःच्या मर्यादेत ठेवली.