Wednesday, September 28, 2022
HomeZP ते मंत्रालयभारतीय वंशाचा 'बेन किंग्जले' जेव्हा जगातील सर्वश्रेष्ठ 'गांधीची' भूमिका साकारतो!

भारतीय वंशाचा ‘बेन किंग्जले’ जेव्हा जगातील सर्वश्रेष्ठ ‘गांधीची’ भूमिका साकारतो!

बायोपिकच्या माध्यमातून ऐतिहासिक व्यक्तिरेखांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न हॉलिवुडमध्ये तसेच बॉलिवूड मध्ये कित्येकांनी केला आहे. कित्येकदा मोठाले दिग्दर्शक वर्षानुवर्ष एकाच थीमने पछाडलेले असतात. त्यांच्या कल्पनेत असलेल्या चित्राप्रमाणे सारं काही जुळून यायला वेळ लागतो. पण ती कल्पना साजेशी अशी सत्यात उतरते तेंव्हा मात्र चित्रपटाचा उत्कृष्ट नमुना म्हणूनच उतरते. अशा कित्येक चित्रपटांचे आपण साक्षी आहोत. परंतु ही कल्पना प्रत्यक्षात उतरवताना या स्ट्रगलमधून, प्रतिक्षेतूनच, कष्टातून एखादी अजरामर कलाकृती निर्माण होते. त्याच एका उत्कृष्ट कलाकृती बद्दल आपण आज बोलूया… विख्यात ब्रिटिश दिग्दर्शक आणि कलाकार सर रिचर्ड अ‍ॅटनबरो यांनी बनवलेल्या ‘गांधी’ या बायोपिक बद्दल बरीच चर्चा झाली होती.

गांधी हा १९८२ मध्ये प्रदर्शित झालेला इंग्लिश चित्रपट होता. मोहनदास करमचंद गांधी यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले होते. महात्मा गांधी यांच्यावर सिनेमा काढण्यासाठी अ‍ॅटनबरो हे जवळपास वीस वर्षे प्रयत्नशील होते. गांधी व्यक्तीरेखेवर खूप अभ्यास करून अखेरीस १९८० मध्ये शूटिंग सुरू झाले आणि १९८२ मध्ये सिनेमा पूर्ण होऊन प्रदर्शित झाला.

हा चित्रपट सुचण्यामागचे एक कारण असे की, १९६२ मध्ये एका सामाजिक उपक्रमात लंडनमधील भारतीय नागरी सेवेचे अधिकारी मोतीलाल कोठारी यांची रिचर्ड अ‍ॅटनबरो यांच्याशी भेट झाली होती. मोतीलाल यांनी अ‍ॅटनबरो यांच्याकडे गांधीजींवर चित्रपट बनवण्याचा आग्रह धरला. सुरुवातीला अ‍ॅटनबरो यांनी गांधीजींबद्दल जास्त माहिती नसल्याचे सांगून टाळले. परंतू हट्टाला पेटलेल्या मोतीलाल यांनी अ‍ॅटनबरो यांना गांधीजींबद्दलची अनेक पुस्तके वाचायला दिली. आणि मग त्या वाचनाने अ‍ॅटनबरो प्रभावित झाले. त्यांनी चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. अ‍ॅटनबरो यांनी गांधी चित्रित करण्याआधी त्यांना व्यक्ती म्हणून समजून घेतले आणि तसेच सादर केले. गांधींना सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणून सादर करण्याचा मोह त्यांनी टाळला. त्याऐवजी त्यांनी गांधीजींच्या लहान कृती दाखवण्यावर भर दिला. ‘गांधी’ हे रसायन तयार होण्याचा संपूर्ण प्रवास त्यांनी रेखाटला. अगदी आफ्रिकेपासून ते भारतभर फिरण्याचा प्रवास चित्रपटात फार सूक्ष्मपणे मांडला आहे.

गांधी चित्रपट १९८२ मध्ये प्रदर्शित झाला. त्याअगोदर वेगवेगळ्या प्रोपगंडा मधून वेगवेगळे गांधी जनमानसाच्या मनात बिंबवले गेले होते. देशाची फाळणी करणारा गांधी, भगतसिंगांना मदत न करणारा गांधी, ५५ कोटींचे दान देणारा गांधी असे कितीतरी गांधी समाजजीवनात रूढ गेले होते. स्वातंत्र्यानंतरच्या या पिढीला अ‍ॅटनबरो यांनी हे खरे वास्तववादी गांधी दाखवले. ते लोकांना भावले आणि या चित्रपटाला जगात सर्वत्र भरभरून प्रतिसाद मिळाला.

विशेष बाब म्हणजे महात्मा गांधींची भूमिका केली होती बेन किंग्जले या अभिनेत्याने. ते मूळचे कृष्णा भानजी म्हणजे गुजरातचे. त्याचे वडील गुजराती होते आणि आई ब्रिटिश. मूळचा भारतीय वंशाचे बेन किंग्जले महात्मा गांधींच्या भूमिकेत फिट्ट बसले. त्याच्या यां भूमिकेची छाप इतकी जबरदस्त पडली की, आजही हॉलिवुडमध्ये आणि भारतात ‘गांधी’ मधील ती भूमिका त्यांची ओळख बनली आहे. गांधीजी हे व्यक्तिमत्त्व जिवंत करणारा अनुभव दिला. ते गांधींची भूमिका साकारणारे अभिनेते बेन किंग्जले यांनी. ‘गांधी’च्या उच्च प्रतीचा श्रेष्ठ अभिनय त्याला नंतर कधीही करता आला नाही. कारण त्या उंचीची भूमिका नंतर त्याला मिळू शकली नाही. थोडक्यात एखादी कलाकृती एकदाच सर्वश्रेष्ठ ठरते. त्याच प्रतीची कलाकृती कुणीही इतिहासात किंवा आजतागायत कुणीही वठवली नाही. हेही तितकेच खरे! त्यांच्याशिवाय या चित्रपटाची कल्पनाही करता येणार नाही. बेन हे गांधीजींची भूमिका करण्यासाठीच जन्माला आले असंही म्हणणं कदाचित अतिशयोक्ती ठरणार नाही.

ह्या चित्रपटाच्या शूटिंग साठी नेहरूंनी आणि इंदिरा गांधींनी मदत केली होती.या महाकाय चित्रपटाचे काम आवाक्याबाहेर जातंय असं लक्षात आल्यावर अ‍ॅटनबरो यांनी चित्रपटाची कथा लिहिण्यासाठी तीन-तीन पटकथा लेखक नेमले होते. या प्रक्रियेमध्ये त्यांना पंडित नेहरू आणि इंदिरा गांधीं यांची विशेष मदत झाली होती. १९६४ मध्ये चित्रपटाचा पहिला ड्राफ्ट पूर्ण झाला होता तेंव्हा तो वाचून प्रतिक्रिया मागवण्यासाठी पंडित नेहरूंना पाठवण्यात आला होता. तो ड्राफ्ट वाचल्यानंतर पंडित नेहरूंनी स्वतः खूप मोठ्या प्रमाणावर अ‍ॅटनबरो यांना मदत करण्याची व्यवस्था केली होती. पुढे अनेक ड्राफ्ट होत राहिले. आणि चित्रीकरणाला सुरुवातीला झाली. तेंव्हा अ‍ॅटनबरो यांची आर्थिक बाजू अजूनही भक्कम नव्हती. त्यांना चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी काही आर्थिक पाठबळ दिले. २२ मिलियन डॉलर चित्रपटाचे पूर्ण बजेट होते. त्यातील ६.५ मिलियन डॉलर इंदिराजींनी एनएफडीसीमधून मिळून दिले.

इंदिरा गांधी यांनी या चित्रपटाचे भारतात चित्रीकरण करण्यासाठी पूर्ण मदत केली होती. अ‍ॅटनबरो यांनी मागणी केली की, भारतातील काही प्रत्यक्ष स्थळांवर शुटिंग करण्याची परवानगी द्यावी. आणि भारत सरकारने परवानगी दिली. महात्मा गांधीजींच्या अंत्ययात्रेच्या सीनच्या शूटिंगसाठी चार लाख लोकांची एक्स्ट्रा कलाकारांची फौज इंदिराजींनी जमा करून दिली होती. तत्कालीन संसदेच्या अधिवेशनात या चित्रपटाला दिलेल्या खर्चाबद्दल आणि मदतीबद्दल राजकीय गदारोळ माजला होता. परंतु  इंदिराजींनी विरोधांकडे दुर्लक्ष करून खंबीरपणे अ‍ॅटनबरो यांना मदत केली होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दिल्लीला मोठ्या थाटामाटात चित्रपटाचा पहिला शो दाखवला गेला होता.

प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला प्रतिसादही तेवढ्याच प्रमाणावर मिळाला. अकरा ऑस्कर पुरस्कारासाठी या चित्रपटाचे नामांकन झाले होते. त्यापैकी आठ ऑस्कर पुरस्कार या चित्रपटाने मिळवले होते. इतरही लहान-मोठ्या पुरस्कार मिळवले होते. संपूर्ण जगभरात या चित्रपटाने १०० मिलियन डॉलरपेक्षा जास्त व्यवसाय केला. डीव्हीडी आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर अजूनही हा चित्रपट व्यवसाय करतो आहे. ‘गांधी’ हा चित्रपट जगात सर्वांत जास्त बघितलेल्या जाणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. हे सर्व शक्य झाले अ‍ॅटनबरो यांच्या २० वर्षाच्या तपचर्येमुळे आणि बेन किंग्जले या अभिनेत्यामुळे! तसेच नेहरूंनी आणि इंदिराजींनी केलेल्या सहकार्यामुळे!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments