‘यास’ चक्रीवादळाचा पुण्यात काय परिणाम? जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

पुणे : तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यातून पूर्णपणे सावरण्याआधीच देशावर आणखी एका चक्रीवादळाचं संकट आलं आहे. ‘यास’ हे चक्रीवादळ देशात धडकलं आहे. या चक्रीवादळाचा तडाखा प्रामुख्यानं पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्याला बसणार आहे.
असं असलं तरी राज्यात काही ठिकाणी याचा प्रभाव पाहायला मिळणार आहे. त्यापैकी पुण्यात हवा आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्याचा विचार करता यास चक्रीवादळाचा परिणाम काही ठिकाणी दिसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यात प्रामुख्यानं पुण्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुण्यात खेड, पुरंदर, हवेली आणि पुणे तालुक्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात काही भागामध्ये ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
आज ‘यास’ वादळ ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर येऊन धडकणार –
बंगालच्या उपसागरात घोंघावणाऱ्या यास चक्रीवादळानं सोमवारी उग्र रुप धारण केलं आहे. परिणामी मंगळवारी ओडिशातील धामरा परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे. काल रात्रीपर्यंत यास चक्रीवादळ ओडिशातील पारादीप बंदरापासून २०० किमी अंतरावर होतं.
भारतीय हवामान खात्यानं जारी केलेल्या अद्ययावत माहितीनुसार, हे वादळ आज (सकाळी सात वाजता) धामरा बंदरापासून पूर्वेला ४० किमी अंतरावर पोहोचलं आहे. तर बालासोर बंदरापासून दक्षिण-पूर्वेला ९० किमी अंतरावर हे वादळ येऊन ठेपलं आहे. आज हे वादळ ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर येऊन धडकणार आहे. ओडिशा किनारपट्टीवर हे वादळ सकाळी १०-११वाजण्याच्या सुमारास येऊन धडकेल, असा अंदाज आहे. या दरम्यान ताशी १५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.