खासदारांच्या आत्महत्या प्रकरणात दोषींवर कारवाई होणार: गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई: दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी डेलकर यांच्या आत्महत्येची चौकशी व्हावी या संदर्भात देशमुख यांना निवेदन केले आहे. त्यावेळी देशमुख बोलत होते.
डेलकर यांच्या आत्महत्येची चौकशी करून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. असे देशमुख यांनी स्पष्ट केले. डेलकर हे सात वेळा दादरा आणि नगर हवेलीचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. अशा व्यक्तीने आत्महत्या केल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली आहे. त्यामागे काय कारण असेल. त्यांनी पत्र लिहून ठेवले असून त्यात दादरा आणि नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांचे नाव घेतले आहे. त्यांच्या दबावाखाली त्यांनी आत्महत्या केली आहे का? पटेल यांच्यावर केंद्राचा दबाव होता का? तेथे त्यांना न्याय मिळणार नाही म्हणून त्यांनी मुंबईत आत्महत्या केली का? असे अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत. या सर्व प्रश्नांची चौकशी करण्यात येईल आणि दोषीवर कारवाई करण्यात येईल, असे देशमुख यांनी सांगितले.