आम्हाला शिवसेनेची सगळी अंडी पिल्ली माहिती आहेत: नितेश राणे
मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ आढळून आलेल्या स्फोटक प्रकरणी निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाली आहे. यानंतर आता वेगवेगळे खुलासे समोर येत आहे. त्यातच भाजप आमदार नितेश राणे यांनी युवा सेना सरचिटणीस वरुण सरदेसाई यांच्यावर आरोप केले होते. यासंदर्भात वरूण सरदेसाई यांनी नितेश राणे यांना नोटीस पाठवण्याची धमकी दिली आहे. मात्र जर त्यांनी नोटीस पाठवली तर आम्ही शिवसेनेचे अनेक प्रकरणे बाहेर काढू, असे वक्तव्य भाजप नेते नितेश राणे यांनी केले आहे.
पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी आयपीएलवर बेटिंग घेणाऱ्याकडून १५० कोटी घेतले आणि त्यानंतर वरुण सरदेसाई यानी वाझे यांना फोन करून पैसे मागितल्याचा आरोप राणे यांनी केला होता. त्याला उत्तर देतांना वरुण सरदेसाई यांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते. तसेच नितेश राणे यांना नोटीस पाठविणार असल्याचे सांगितले होते.
यावेळी नितेश राणे यांनी सांगितले की, आम्ही बाळासाहेबांची ३९ वर्षे सेवा केली आहे. त्यामुळे आम्हाला शिवसेनेची सगळी अंडी पिल्ली माहिती आहेत. तुम्ही आमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी काढत असाल तर आम्ही सुद्धा रमेश मोरे, सोनु निगम, चंदू पटेल आणि नंदकुमार त्रिवेदी हि प्रकरण बाहेर काढू का? हि प्रकरण बाहेर आली तर तुमच्या कुटुंबाला महाराष्ट्रात फिरता येणार नाही. असे राणे यांनी सांगितले.
वरुण सरदेसाई मला कोर्टाच्या नोटीसची धमकी देऊन माझ्यावर दबाव आणू पाहत आहे का, असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला. असल्या धमक्यांना मी घाबरत नाही. माझ्याकडे असलेली माहिती मी तपास यंत्रणांना त्यांनी मागितल्यावर देईन, असे राणे यांनी सांगितले.