Saturday, October 1, 2022
Homeशिक्षणखासगी कंपन्यांमार्फत परीक्षा नको, आमचा MPSC वर विश्वास

खासगी कंपन्यांमार्फत परीक्षा नको, आमचा MPSC वर विश्वास

खासगी कंपन्या मार्फत परीक्षा घेऊ नयेत यासाठी #onlympsc मोहीम

पुणे: स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळावे यासाठी विद्यार्थी दहा-दहा वर्ष कष्ट घेत असतात. मात्र काही जण संस्थात्मक त्रुटींचा फायदा घेऊन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय करत असतात. त्याला आपली सिस्टीम साथ देत असते. अशाच प्रकारे बंदी घातलेल्या कंपनीकडून सरळसेवा भरती परीक्षा घेऊन अभ्यास करणाऱ्या मेहनतीवर पाणी फेरण्याचे काम महाराष्ट्रात सुरु आहे. खासगी कंपनीच्या माध्यमातून परीक्षा घेऊन पावित्र्य धोक्यात आले आहे. यामुळे राज्य सरकारने गट ‘अ’ पासून ते गट ‘ड’ सर्व परीक्षा एमपीएससी मार्फतच घ्यायला हव्यात अशी मागणी प्रहारजनशक्ती पक्षाचे विद्यार्थी प्रतिनिधी सचिन ढवळे यांनी केली. तसेच त्यांच्याकडून #onlympsc अशी मोहीम राबविण्यात येत आहे.  

सरळसेवा भरती मध्ये आधीपासून गोंधळाची स्थिती आहे. यापूर्वी महापोर्टल कडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये होणारा गोंधळ सर्वांनी पाहिला आहे. याबाबत अनेक व्हीडीओ बाहेर आले आहेत. एका संगणकावर दोन जणांना बसून परीक्षा दिल्या असल्याच्या घटना सुद्धा समोर आल्या आहेत. याप्रकरणी विद्यार्थ्यांकडून अनेक तक्रारी आल्यानंतर हे पोर्टल बंद करण्यात आले.

ढवळे म्हणाले, महाविकास आघाडीच्या सरकारकडून गेल्या वर्षी बंदी घातलेल्या कंपनीला सरळ सेवा भरती परीक्षा घेण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरात गट ‘क’ गट ‘ड’ प्रवर्गात एकही परीक्षा घेण्यात आली नाही. मात्र काल राज्यभर घेण्यात आलेल्या आरोग्य सेवक भरती परीक्षेत उडालेला गोंधळ पाहायला मिळाला. खासगी कंपनीकडे कारभार दिला तर कशा प्रकारे गोंधळ उडतो हे सर्वांनी पाहिले आहे. अनेकांना परीक्षेला मुकावे लागले. वारंवार असे प्रकार घडत असेल तर विद्यार्थ्यांनी परीक्षा देणे सोडायला हवे. जर हे थांबायचे असेल तर गट ‘अ’ पासून ते गट ‘ड’ सर्व परीक्षा एमपीएससी मार्फतच घ्यायला हव्यात अशी मागणी ढवळे यांनी केली आहे.

सरळ सेवा भरती परीक्षेतील गोंधळ, गैरकारभार थांबून विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी ढवळे यांच्या मार्फत #onlympsc अशी मोहीम राबविण्यात येत आहे. यात लोकप्रतिनिधी, महत्वाच्या खात्याचे मंत्री, अधिकारी यांना ट्वीट, मेसेज, फोन करणे, मुख्यमंत्री, सचिव यांना मेल आणि महत्वाचे मंत्री, खाते, विभाग यांना निवेदन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.      

याबाबत ढवळे म्हणाले, साडेतीन लाख विद्यार्थी परीक्षा देतात. त्यातून १ ते दीड हजार जणांना नोकरी मिळते. मात्र यात मॅनेज करून पद लाटण्यात येते हे चुकीचे आहे. ज्या यंत्रणा वरती तुम्ही विश्वास ठेवून परीक्षा घेत आहे त्या पारदर्शी आहे का? गेल्या ५ ते ६ वर्षात एमपीएससी कडून घेण्यात आलेल्या परीक्षेत कुठलाही गोंधळ झाला नाही. पेपर कधी फुटले, गडबड झाली असा प्रकार कधी झाला नाही. सरळ सेवेच्या भरती मध्ये कधीही अभ्यासिकेत न दिसणारे मुल पास होताना सर्रास दिसते. राज्यभर परीक्षा एकाच दिवशी, एकाच वेळी सर्व सेंटरला व्हायला हवी. त्याच बरोबर मुलांना हवे ते सेंटर द्यायला हवे. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पत्र दिले आहे. त्यात त्यांनी सरळ सेवा भरती मधील परीक्षा पूर्वी प्रमाणे ऑफलाईन घ्यावा अशी मागणी केली आहे. याच बरोबर एमपीएससीला सुद्धा पत्र दिले आहे. याबाबत दोघेही सकारात्मक आहेत. मंत्रिमंडळाने याबाबत निर्णय घ्यावा असेही ढवळे यांनी सांगितले.

एमपीएससी चे सचिव यांनी सरळ सेवा भरती परीक्षा घेण्यासंदर्भात मान्य केले आहे. मात्र काही जणांनकडून एमपीएससी कडून उशिरा निकाल लागतो अशी तक्रार करण्यात येते. हे चुकीचे आहे एमपीएससी कडून उशीर होत नाही. २०१६ नंतर सरकारने समांतर आरक्षण आणि मराठा आरक्षणा बाबत घोळ घालून ठेवल्याने निकालाला उशीर होत आहे याकडे सर्वांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे ढवळे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments