वाझेंनी पुरावे नष्ट केले?
मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके असलेले वाहन सापडल्यानंतर राजकारण तापले आहे. त्यातच दररोज नवीन गोष्टी समोर येत आहे. या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली असून अनेक खुलासे समोर येत आहेत. मुंबई पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांची चौकशी सुद्धा सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.
२५ फेब्रुवारीला अंबानीच्या घराबाहेर स्फोटके मिळाल्यानंतर हा तपास मुंबई पोलीस करत होते. तपास अधिकारी म्हणून सचिन वाझे यांची नेमणूक करण्यात आली होती. दरम्यान वाहन मालक हा ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन असल्याचे तपासात समोर आले होते. याबाबत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आवाज उठविला होता. तसेच सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. काही दिवसात मनसुख हिरेन यांचा मृत्यू झाला. हिरेन यांच्या पत्नी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात वाझे यांच्यावर संशय व्यक्त केला होता.
यानंतर या सर्व प्रकरणाचा तपास राष्ट्रीत तपास यंत्रणा (NIA) कडे देण्यात आला. यानंतर सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. मात्र या नंतर एक-एक खुलासे समोर येत आहे. सचिन वाझे तपास अधिकारी असतांना या प्रकारात पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. वाझे यांनी तपासाच्या नावाखाली मनसुख हिरेन प्रकरणात अनेक पुरावे, मुद्देमाल जप्त केले होते. मात्र, या गोष्टी त्यांनी रेकॉर्डवर ठेवल्या नाही.
वाझे यांच्या ठाण्यातील त्यांच्या सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज मुंबई पोलिसांनी २ मार्च रोजी काढून नेल्याची माहिती समोर आली आहे. सचिन वाझे राहत असलेल्या साकेत सोसायटीत ५१ सीसीटीव्ही आहेत. या कॅमेराचा फुटेज असणारा डीव्हीआर पोलिसांनी नेल्याचे तेथील सुरक्षा रक्षकांनी सांगितले. हा डीव्हीआर कोणत्या पोलिसांनी नेला याबाबत अजून काही समजले नाही. तसेच मनसुख हिरेन यांच्या मालकीचे वाहन याच सोसायटीत लावण्यात आले होते असे सांगण्यात येत आहे.