जेष्ठ अभिनेते लेखक वीरा साथीदार काळाच्या पडद्याआड

नागपूर: जेष्ठ अभिनेते लेखक वीरा साथीदार यांचे कोरोनामुळे निधन झाले. सोमवारी मध्यरात्री वीरा साथीदार यांनी अखेरचा श्वास घेतला. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या ‘कोर्ट’ सिनेमातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली होती. कोरोना झाल्यानंतर त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार चालू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. आठ दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तर गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.
वर्धा जिल्ह्यातील जोगीनगर येथे वीरा लहानाचे मोठे झाले. गरिब कुटूंबात जन्माला आलेल्या वीरा यांना शिकण्याची ताकद त्यांच्या आईनेच दिली. वीरा यांचे वडील नागपुर येथील रेल्वे स्थानकावर हमालीचे काम करायचे तर आई बांधकाम मजूर म्हणून राबायची. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वीरा साथीदार यांच्यावर पगडा होता. त्यांनी पत्रकार म्हणूनही अनेक वर्ष काम केलं. ते स्वत: गीतकारही होते.
‘कोर्ट’ या चित्रपटात वीरा साथीदार यांनी भूमिका साकारली होती. कोर्ट या चित्रपटाचा जोरदार डंका वाजला. रसिकांसह अनेक पुरस्कारांनी कोर्ट चित्रपटाचा गौरव झाला. राष्ट्रीय पुरस्कारही कोर्ट चित्रपटाला मिळाला. भारताकडून ऑस्करसाठीही या सिनेमाला नामांकित करण्यात आले होते. सर्वश्रेष्ठ परदेशी भाषेतील सिनेमा यासाठी कोर्टला नामांकन देण्यात आलं होतं.आंबेडकर चळवळीतील अनेक गाणीही त्यांनी गायली आहेत. ‘विद्रोही’ नावाच्या मासिकाचे संपादन केले. ‘रिपब्लिकन पँथर’ संघटनेच्या माध्यमातून ते वंचितांसाठी काम करत होते. त्यांची व्याख्यानं विशेष गाजली होती. पत्रकार म्हणून काम करताना त्यांनी शोषित-पीडितांना न्याय देण्यासाठी मोठा संघर्ष केला होता अशा या विचारवंत, लेखक, अभिनेते वीरा साथीदार यांचे सोमवारी मध्यरात्री निधन झाले.