|

आठवडाभरात लस पुरवठा न वाढल्यास सीरम इन्स्टिट्यूटमधून अन्य राज्यात जाणारी वाहने रोखणार – राजू शेट्टी

Vehicles going to other states from Serum Institute will be stopped if vaccine supply does not increase within a week - Raju Shetty
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

कोल्हापूर: कोरोना प्रतिबंधक लसीच्या तुटवड्यामुळं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लसीकरण थांबवावं लागलं आहे. राज्याला गरज असताना केंद्राकडून पुरेशी लस पुरवली जात नसल्याचा राज्य सरकारचा आक्षेप आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या संदर्भातील आकडेवारीच जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अन्य पक्षांच्या नेत्यांनीही आता केंद्राविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारला थेट इशाराच दिला आहे.
राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांना तसं पत्रच लिहिलं आहे. महाराष्ट्राला होणारा लसीचा पुरवठा येत्या आठवडाभरात न वाढल्यास पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला घेराव घालण्याचा इशारा शेट्टी यांनी दिला आहे. ‘सीरम इन्स्टिट्यूटमधून लस घेऊन देशाच्या अन्य राज्यांत जाणारी वाहने रोखली जातील,’ असं शेट्टी यांनी पत्रात म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदी हे उत्सवप्रिय आहेत. त्यांनी आता नव्या टीका उत्सवाची घोषणा केली आहे. कोविड १९ ची लस नागरिकांनी घ्यावी यासाठी हा उत्सव साजरा केला जाणार आहे. ही चांगली गोष्ट आहे. लस घ्यायला लोक तयार आहेत. महाराष्ट्रातील लोक तर लसीसाठी आक्रोश करत आहेत. पण त्यांना लस मिळत नाही. अनेक केंद्रे बंद पडली आहेत. त्याकडं पंतप्रधानांचं लक्ष आहे का?,’ असा प्रश्न शेट्टी यांनी केला आहे. ‘देशभरातील एकूण कोरोना रुग्णांपैकी अर्धे रुग्ण महाराष्ट्रात आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राला लसीचा पुरवठा जास्त केला पाहिजे एवढी साधी बाब यांच्या लक्षात येत नसेल तर दुर्दैव आहे. त्यामुळंच मी हे पत्र लिहिलं आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे. ‘आमची लोक इथं लसीअभावी तडफडत असताना तुमचा टीका उत्सव हवा कशाला?, असा प्रश्नही त्यांनी केला आहे. लस पुरवठ्याबाबत महाराष्ट्राला सापत्न वागणूक मिळणार असेल तर राज्यात अर्थात, पुण्यात तयारी होणारी लस राज्याबाहेर जाऊ दिली जाणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी पत्राच्या माध्यमातून दिला आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *