Monday, September 26, 2022
Homeब-बातम्यांचासुएज कालव्यात ट्राफिक जॅम, महाराष्ट्रातील द्राक्ष बागायतदारांना फटका!

सुएज कालव्यात ट्राफिक जॅम, महाराष्ट्रातील द्राक्ष बागायतदारांना फटका!

काहिरा: इजिप्तचा सुएज कालवा म्हणजे समद्रातील १९३.३ किमीचा एक चिंचोळा मार्ग. या कालव्यावर सत्ता गाजवण्यासाठी अनेक युध्द झाली आहेत. सध्या सुएज कालवा इजिप्तच्या ताब्यात आहे. सुएज कालवा आशियाला युरोपशी जोडण्याचं काम करतो. याच कालव्यात चीनहून मालवाहतूक करणारे एक महाकाय कंटनेर जहाज अडकले आहे. यामुळे समुद्रात मोठ्या प्रमाणावर ट्राफिक जॅम झाले आहे.

मंगळवारी सकाळी ७.४० च्या सुमारास, चीनमधून माल भरुन एक कार्गो शीप नेदरलॅन्डला रवाना होत असताना या कालव्यात फसलं. समुद्री वाऱ्याच्या जोराच्या झोक्याने या जहाजाला दुसऱ्या दिशेला फिरवलं त्यामुळे चालकाचं जहाजावरचं नियंत्रण सुटल्याने हे ४०० मीटर लांबीचं आणि ५९ मीटर रुंदीचं जहाज या कालव्यात फसलं. त्यामुळे हा समुद्री मार्ग ब्लॉक होऊन समुद्रात जहाजांचं ट्रॅफिक जाम झाल्याचं पहायला मिळतंय. हा मार्ग आता खुला होण्यासाठी काही दिवस लागतील असं सांगण्यात येतंय.

या समुद्री मार्गे होणारी वाहतूक थांबली आहे. सुएज कालव्यात हे महाकाय जहाज अडकल्याने जगाचे  तासाला सुमारे २ हजार ८०० कोटी रुपयांची अर्थव्यवस्था थांबलीय. इतकच नाहीतर सुएझ कालवा कोंडीचा नाशिकच्या द्राक्ष निर्यातदारांनाही फटका बसला आहे. नाशिकचे द्राक्ष निर्यातदार राजाराम सांगळे यांचे २५ कंटेनर सध्या सुएझ कालव्यात अडकले आहेत.

 “आशिया आणि युरोपला जोडणारा हा वन वे कालवा आहे. एका बाजूची ट्रॅफिक थांबली की दुसऱ्या बाजूची वाहतूक सुरु होते. दिवसाला या कालव्यातून ६० बोटी पास होत असतात. पण गेल्या काही दिवसांपासून सर्वच बोटी येथे अडकल्या आहेत. त्यामुळे आमचे द्राक्षांचे २५ कंटेनर अडकले आहेत. तर संपूर्ण महाराष्ट्रातील हजारांहून जास्त असेल. पुढील ३-४ दिवसांत सुरळीत झाले नाही तर अवघड होईल.” राजाराम सांगळे यांनी एबिपी माझा वृत्त वाहिनीशी बोलतांना सांगितले.

“इजिप्तचा मध्ये द्राक्षाच सीझन १५ मे रोजी सुरु होतो. उशिरा द्राक्ष पोहोचल्यानं त्याला किंमत मिळणार नाही आणि द्राक्षंही खराब होतील. तसेच एकाच वेळी भरपूर द्राक्ष गेली तर भावही कमी होईल आणि द्राक्षांना कवडीमोल भाव मिळेल. त्यामुळे शिपिंग लाईनसोबत आम्ही सतत संपर्कात आहोत. उद्या रविवारी एक मोठा प्रयत्न होणार आहे. परिस्थिती पूर्ववत झाली नाही तर अवघड होईल. कोरोनाचा आधीच फटका बसलाय, त्यात युरोपमध्ये आधीच आपल्या मालाची किंमत कमी झाली आहे.”, अशी चिंताही द्राक्ष निर्यातदार राजाराम सांगळे यांनी व्यक्त केली.

बुधवारी इजिप्तच्या प्रशासनाकडून कालव्यात हे फसलेलं जहाज बाजूला करण्यासाठी प्रयत्न केले गेले. त्यासाठी आठ टगबोट्सचा वापर करण्यात आला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. याच समुद्री मार्गाने रोज जवळपास सरासरी ९० मोठी जहाजं आणि इतर अनेक लहान जहाजं प्रवास करतात. या जहाजाचा मालक जपानी व्यक्ती आहे. त्याला वाटते की शनिवार संपेपर्यंत हा समुद्री मार्ग मोकळा होईल. पण तज्ज्ञांच्या मते, हा मार्ग मोकळा व्हायला अजून काही आठवड्यांचा काळ जाण्याची शक्यता आहे.  

या चार दिवसात जवळपास ४०० जहाजांची वाहतूक बंद झाली आहे. हा कालवा ब्लॉक झाल्याने रोज जवळपास सरासरी ९.७ बिलियन डॉलर्सच्या मालाची वाहतूक थांबलीय. त्यामध्ये ५.१ बिलियन डॉलर्सची वाहतूक ही पश्चिमी देशांची आहे तर ४.६ बिलियन डॉलर्सची वाहतूक ही पूर्वेकडच्या देशांची आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments