पुण्यात मिनी लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी वाहतुकीचा फज्जा; वाहनाच्या लागल्या रांगा

पुणे: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुण्यात आज पासून मिनी लॉकडाऊन लावण्यात आले आहे. तसेच दिवसा जमावबंदी तसेच सायंकाळी ६ नंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मिनी लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशीच पुणे शहरातील मुख्य रस्त्यावर सायंकाळी ५ नंतर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.
पुणे शहरात सायंकाळी ६ ते सकाळी ६ या वेळेत संचारबंदी करण्यात आली आहे. आज पासून पुढील ७ दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत माहिती दिली. मिनी लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशीच मात्र शहरातील रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. साधारण ५ नंतर खासगी कार्यालये सुटले आणि शहरातील रस्त्यावर गर्दी झाल्याचे दिसून आले. सायंकाळी ६ नंतर बाहेर पडल्यास कारवाई होईल या भीतीने एकाचवेळी नागरिक बाहेर पडल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.
तसेच मिनी लॉकडाऊन मध्ये पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणारी पीएमपीएमएलची सेवा बंद ठेवण्यात आली आहे. पीएमपीएल साधारण १ हजार ७०० बसेसच्या माध्यामतून सेवा देत असते. या बस बंद असल्याने नागरिक आपले वाहन घेऊन बाहेर पडले होते. एकाचवेळी मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर पडल्याने शहरात काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.