तीन लाख जणांना रोज लस मिळालीच पाहिजे – राजेश टोपे
राज्यात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे कोरोना नियंत्रणात आणायचा असेल तर लसीकरण हा पर्याय असल्याचं बोललं जात आहे.. त्यामुळेच लसीचे जास्तीचे डोस राज्यात पुरवले जावे अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल केंद्राकडे केलीये. राज्य सरकारने केंद्राकडे अनेक महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. त्यात भारत बायोटेकचं तंत्रज्ञान हाफकिनलाही मिळावं, लसीकरणासाठी १०० बेडच्या रुग्णालयाची जी जाचक अट घातली आहे, ती रद्द करण्यात यावी अशा मागण्यांचाही समावेश होतो.
केंद्रासोबत चालू असलेल्या चर्चेबाबत आणि सध्याच्या राज्यातल्या कोरोनाच्या स्थितीवर बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, ‘१८ वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्यांना सगळ्यांनाच व्हॅक्सिनेशन करून घ्यायला आवडेल. सगळ्यांनाच व्हॅक्सिनेशन करून घ्यायचंय आहे आणि तशी गरजही आहे. परंतु केंद्रसरकारने एक प्राधान्य क्रम दिलेला आहे त्या प्राधान्यक्रमामध्ये त्यांनी हेल्थ वर्कर्स, फ्रंट लाईन वर्कर्स, वय वर्ष ४५ आणि ६० पेक्षा अधिक असणारे नागरिक, असा प्राधान्य क्रम त्यांनी ठरवलेला आहे. समाजातला हा घटक जर आपण पूर्ण केला तर युनिव्हर्सल व्हॅक्सिनेशन करणं सुद्धा आपल्याला शक्य आहे.परंतु ते धोरण केंद्र सरकारकडून नंतर ठरवलं जाईल.’
याबाबत पुढे बोलताना आरोग्यमंत्री म्हणून मीही काही गोष्टी कटाक्षाने बघणार असल्याचं सांगितलंय ,’आज आम्ही जे ठरवलेलं आहे त्यात मात्र अग्रेसिव्ह व्हॅक्सिनेशन करून घेण्याचा आमचा मानस आहे. तीन लाख व्हॅक्सिनेशन रोज झालेच पाहिजेत असं मी स्वतः कटाक्षाने राज्यामध्ये आरोग्यमंत्री म्हणून पाहणार आहे आणि त्या अनुषंगाने दररोज आणि आठवड्याला २० लाखापेक्षा जास्त व्हॅक्सिनेशनचे डोसेस आम्हाला पाहिजेत अशी मागणी आम्ही आरोग्यमंत्रालयाकडे केलीये आणि त्या दृष्टीने आम्ही काम करतोय.’
लसींच्या उत्पादनावर बोलताना,’हाफकिन इन्स्टिट्यूट जी रिसर्च इन्स्टिट्यूट आहे त्यांच्याकडे सर्व प्रकारचे उत्पादनाचे संसाधनं आहेत. या सगळ्या दृष्टिकोनातून त्याचा वापर जर आत्ताच्या घडीला करता आला किंवा फील अँड फिनिश यासाठी करता आला तर आम्ही त्याचा पुरेपूर वापर करू शकतो,आम्ही तसा प्रस्ताव केंद्राकडे ठेवला आहे. माझ्या माहितीनुसार २२ कोटी लसींचं उत्पादन हाफकिन इन्स्टिटयूट एका वर्षात करू शकतं.’असंही राजेश टोपे म्हणालेत.
स्टॉक २३ लाख उपलब्ध असल्याची माहिती जरी खरी असली तरी तो ७ ते १० दिवसातच संपुष्टात येणार आहे. त्यामुळे आम्हाला पुढे दर आठवड्याला २० लाख लसींचा पुरवठा करण्यात यावा ही मागणी रास्त असल्याचंही टोपे म्हणालेत याशिवाय त्या गतीनं आम्हाला डोसेस उपलब्ध व्हावेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.