साताऱ्यात बगाड यात्रेला हजारोंची गर्दी, कोरोना नियम धाब्यावर

सातारा: राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोनाबाबत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधामध्ये सभा, मेळावे, आणि धार्मिक कार्यक्रमांवर बंदी आणली आहे. राज्यात धार्मिक कार्यक्रमांवर बंदी असतानाही साताऱ्यातील बावधनमध्ये बगाड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. हजारो भाविकांनी या यात्रेला उपस्थिती लावली आहे. शासकीय नियमांना झुगारुन लावत बावधनमधील नागरिकांनी बगाड यात्रा उत्साहात साजरी केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. राज्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून या यात्रेचं लौकिक आहे. भाविकांची मोठी श्रद्धा असली तरी या गर्दीमध्ये कोरोना नियमांचे पालन करण्यात आलेले नाही. गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता आहे.
बावधन येथील भैरवनाथाची बगाड यात्रा दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी होते. यावेळी गावामध्ये करोना बाधितांची संख्या वाढत असल्याने व यात्रेच्या अनुषंगाने गर्दी वाढू नये म्हणून गाव संपूर्ण गाव परिसर प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केलेला होता. मागील आठ दिवसापासून गावातील सर्व व्यवहार बंद होते. बगाड यात्रा होऊ नये यासाठी प्रांताअधिकारी संगीता चौगुले राजापूरकर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शितल जानवे खराडे, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, तहसीलदार रणजीत भोसले, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर आदींनी गावामध्ये अनेक बैठका घेऊन ग्रामस्थांनी कोरोना काळामध्ये यात्रेला घातलेल्या बंदीबाबत जनजागृती करत बगाड यात्रा करू नये असे आवाहन केले होते. संपूर्ण राज्यात बावधनची भैरवनाथ बगाड मोठी व एकमेव यात्रा म्हणून ओळखली जाते. मात्र आज अचानक पहाटे अचानक ग्रामस्थांनी बगाड रथ बांधून कृष्णा तीरावरून वाजत गाजत गावात आणला. परंतु प्रशासनाच्या आदेशांना केराची टोपली दाखवत हजारो भाविकांच्या उपस्थित ही बगाड यात्रा करण्यात आली आहे.
राज्यभरात कोणत्याही धार्मिक कार्यक्रम आणि यात्रेला परवानगी नसताना या यात्रेचे आयोजन कसे करण्यात आले? कोणाच्या परवानगीने या यात्रेचे आयोजन करण्यात आले? यात्रा करण्यात आली तेव्हा परिसरात पोलीस उपस्थित नव्हते का? प्रशासन काय करत होते आणि जर तिथे पोलीस उपस्थित होते तर त्यांना कारवाई का केली नाही असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.