…या तरुणाने एस. एम. जोशी यांच्या गळ्यात चपलांची माळ घातली
२७ जुलै १९७८ रोजी महाराष्ट्र विधानमंडळाने मराठवाडा विद्यापीठाचे ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर मराठवाड्यातील काही प्रतिगामी शक्तींनी या निर्णयाला विकृत स्वरूप देऊन मराठवाड्याच्या अस्मितेचा बागुलबुवा उभा करून, तरुणांची डोकी भडकवली आणि त्यातून मराठवाड्यात या निर्णयानंतर अचानक दंगल पेटवण्यात आली होती. महाराष्ट्राच्या एका महान पुरोगामी निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरिता तब्बल सोळा वर्ष खर्ची पडली होती. १४ जानेवारी १९९४ रोजी ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ नावाची घोषणा करण्यात आली. अवघ्या २४ तासात औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाच्या कमानीवर ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असे शब्द चितारले गेले. नामांतराचा निर्णय हा केवळ विद्यापीठाची पाटी बदलणारा नव्हता. तर तो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूलतत्त्व पुढे नेणारा निर्णय होता.
२७ जुलै १९७८ चा निर्णय होईपर्यंत, मराठवाड्यात जे पुरोगामी समजले जात होते. समाजवादावर भाषणे देत होते, समाजवादी विचाराचे संपादक म्हणून मिरवत होते. स्वातंत्र्यचळवळीत खादीचे कपडे घालून जे उतरले होते अशा तथाकथित पुरोगामी नेत्यांनी आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली. बाबासाहेबांचे नाव द्यायला याच लोकांनी विरोध करायला सुरुवात केली. बघताबघता मराठवाडा पेटला. शरद पवार यांच्या पुरोगामी निर्णयाला मराठवाड्यातल्याच काही लोकांनीच गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. उसळलेली दंगल इतकी भीषण होती की, निरपराध लोकांच्या मालमत्तेला आगी लावण्यात आल्या.
या सर्व काळात शरद पवार यांच्याबरोबर आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या बरोबर अगदी ठामपणे उभे राहिले त्यामध्ये महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, खरे समाजवादी, पुरोगामी नेते एस.एम. जोशी हे होते. शरद पवार यांच्या सोबत त्यांनी दौराही केला. एवढेच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात फिरून शरद पवार यांच्या पुरोगामी निर्णयाचा ठामपणे पुरस्कार केला. हा पुरस्कार करणाऱ्या दौऱ्यादरम्यान मराठवाड्यात असतांना उदगीर येथे प्राचार्य ना. य. डोळे यांच्या घरी एस.एम. जोशी थांबले होते. दुपारी ते जेवायला बसणार तेवढ्यात तिथे या निर्णयाला विरोध करणाऱ्या तरुणांची एक झुंड डोळे यांच्या घरात घुसली. त्यातल्या ओमप्रकाश विश्वनाथ या तरूणाने एस. एम. जोशी यांच्या गळ्यात चपलांची माळ घातली.
वातावरण तापले परंतु मनाचा मोठेपणा असलेल्या एस.एम. जोशी यांनी त्या तरुणाचा राग केला नाही. त्या तरुणाला समोर बसवले. त्याच्याशी नामांतर कां केलं जाणार आहे. आणि बाबासाहेबांचे योगदान काय आहे यावर चर्चा केली. ओमप्रकाशला सांगितले, हा निर्णय का घेण्यात आला आहे. बाबासाहेबांच्या शैक्षणिक कामाची महती काय आहे. ज्या तरुणाने एस. एम. जोशी यांच्या गळ्यात चपलांची माळ घातली होती. तोच तरुण शरद पवार यांच्या निर्णयाचा समर्थक झाला.
यानंतर डॉक्टर ना. य. डोळे यांना सोबत घेऊन आणि उदगीरचे त्यावेळचे आमदार पटवारी यांच्यासोबत ओम प्रकाश विश्वनाथ याने पुणे येथे जाऊन अण्णांची म्हणजेच एस.एम.जोशी यांची भेट घेऊन. त्यांची माफी मागितली. तसेच शरद पवार यांना भेटून त्यांचीही माफी मागितली. शरद पवार यांच्या सोबत त्यावेळी तत्कालीन केरळचे राज्यपाल रा. सु. गवई, ज्येष्ठ समाजवादी नेते ग. प्र. प्रधान, ज्येष्ठ नेत्या श्रीमती शांताबाई दाणी, त्यावेळचे तरूण नेते रामदास आठवले, भाई संगारे, पि.टी बोराडे, त्यावेळचे आमदार कुमार सप्तर्षी देखील होते.
मराठवाड्यातील दंगल आटोक्यात येत नव्हती. मग ३ ऑगस्ट १९७८ रोजी मराठवाड्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करून ‘निर्णय लादला जाणार नाही’, असा निर्णय शरद पवार यांना नाईलाजाने जाहीर करावा लागला होता. किंचित माघार घेताना शरद पवार यांच्या डोळ्यासमोर सगळ्यात मोठा विषय होता तो म्हणजे, मराठवाड्यात शांतता टिकवणे, दलितांची घरे जाळली जाणार नाहीत याची काळजी घेणे, सर्व जाती धर्माचा सलोख्याने निर्माण करणे, त्यासाठी पाच ऑगस्ट रोजी मंत्रालयात एक बैठक आयोजित करून मुख्यमंत्री या नात्याने शरद पवार यांनी शांततेचे आवाहन केले आणि निर्णय न लादण्याची घोषणा केली.