इंग्रजी शिकल्याशिवाय नवरा नांदवणार नाही म्हणून ‘या’ महिलेने इंग्रजीवर प्रभुत्व मिळवले.

महात्मा गांधी जिवंत असताना त्यांच्यावर लिहिलेले पहिले चरित्र हे अवंतिकाबाई गोखले यांनी लिहिले होते. त्या तत्कालीन नामवंत मराठी लेखिका होत्या. १९१८ मध्ये अवंतिकाबाई गोखले यांनी महात्मा गांधी यांचे चरित्र प्रकाशित केले. ज्याला लोकमान्य टिळकांची प्रस्तावना होती. गांधीयुगाच्या सुरुवातीच्या काळात महाराष्ट्राला गांधी जीवनाचा व विचारांचा परिचय करुन देणारे हे चरित्र लक्षणीय आहे. गांधी जिवंत असताना लिहिलेले हे पहिले चरित्र आहे. परिचारिकेचे शिक्षण घेतलेल्या अवंतिकाबाईंनी मराठीबरोबर इंग्रजी भाषेवरही प्रभुत्व मिळवले होते. अवंतिकाबाईंनी याशिवाय चंपारण्यातील सत्याग्रहापासून गांधीजींना साथ दिली.
स्त्रियांच्या व्यक्तिविकास व सबलीकरणासाठी त्यांनी गिरगावात ‘हिंद महिला समाजा’ची स्थापना केली. तसेच गिरणी कामगार स्त्रियांसाठी भारतात प्रथमच पाळणाघरे सुरू केली. अस्पृश्य समाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या त्या होत्या. तसेच १९३० व १९३२ सालच्या मिठाच्या सत्याग्रहात एकमेव महाराष्ट्रीयन महिला म्हणून समावेश होता. तसेच नंतर हळूहळू मिठाच्या सत्याग्रहात मुंबईतून शेकडो स्त्रिया सामील झाल्या. त्याचे श्रेय बाईंनाच जाते. एक नि:स्पृह, स्पष्टवक्ती, अनुशासनप्रिय कार्यकर्ती म्हणून स्वातंत्र्यलढय़ाच्या इतिहासात त्यांना मानाचे पान आहे.
गांधीजी हयात असतांना आणि त्यांच्यानंतर प्रकाशित झालेल्या चरित्र ग्रंथांचा एक आढावा घेतला तर त्यात सर्वप्रथम अवंतिकाबाई गोखले यांच्या नावाचा उल्लेख सर्वत्र आढळतो. चंपारण्य सत्याग्रहात गांधींच्या निरोप्याप्रमाणे त्या रचनात्मक कामासाठी आपले यजमान बबन गोखले यांच्यासह बिहारला गेल्या होत्या. तेंव्हा त्यांनी हा ग्रंथ लिहिला आणि १९१८ ला प्रकाशित केला. तसेच या पुस्तकाला लोकमान्य टिळकांची प्रदीर्घ अशी प्रस्तावना आहे. त्यानंतर १९२४ मध्ये युरोपातील एक लेखक व विचारवंत रोमा रोलाँ यांनी गांधीजींचे एक वैचारिक चरित्र लिहिले. ते १९२४ साली प्रकाशित झाले होते. विशेष म्हणजे त्यानंतर आठ वर्षांनी प्रत्यक्ष रोलाँ आणि गांधीजींची भेट झाली होती.
भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाच्या इतिहासात गांधींची पहिली भारतीय शिष्या म्हणले की, अवंतिकाबाई गोखले यांचेच नाव घेतले जाते. गांधीजींची व अवंतिकाबाईंची ओळख जेंव्हा त्या वेळचे प्रसिद्ध तत्त्वज्ञ व विचारवंत श्रीनिवास शास्त्री यांनी करून दिली तेंव्हाच गांधीजींनी ही बाई सामान्य नाही हे ओळखले. आपण हिंदुस्थानात दलित व स्त्रिया यांच्याकरिता जे काम करू इच्छितो त्यासाठी हीच कार्यकर्ती आपल्याबरोबर हवी, असे गांधीजींना वाटले.
अवंतिकाबाईंचे लग्न त्या अवघ्या नऊ वर्षाच्या असतांना झालं. तोपर्यंत त्यांना लिहिता-वाचता येत नव्हते. सासरी आल्यावर त्या लिहायला-वाचायला शिकल्या. परदेशीं शिकायला गेलेल्या नवऱ्याने अवंतिकाबाईला जाताना धमकी दिली कि, मी परत येईपर्यंत इंग्रजी लिहिता, वाचता आलं पाहिजे नाहीतर तुला नांदविणार नाही. यामुळे घाबरून अवंतिकाबाई आपल्या सासऱ्याकडून इंग्रजी भाषा शिकल्या आणि त्यात पारंगत देखील झाल्या. मध्यमवर्गीय ब्राह्मण स्त्रीचे आयुष्य जगणाऱ्या अवंतिकाबाई १९१९ मध्ये इचलकरंजीच्या राणीसोबत इंग्लंडला गेल्या. कारण होते की, राणीसोबत जाण्यासाठी समवयस्क, शिक्षित व इंग्रजी जाणणारी स्त्री म्हणून अवंतिकाबाईंची निवड झाली होती.
परदेशीं गेल्यावर त्यांनी तेथील अनेक दवाखान्याला भेटी देऊन तिथल्या कार्यपद्धतीची माहिती करून घेतली. सधन, श्रीमंत घरातील स्त्रियांना त्यांनी स्वयंसेवी संस्थांतून काम करताना पाहिले. त्यांच्याशी त्यांचे काम व कामातील अडचणींबाबत चर्चा केली. त्यापासून प्रेरणा घेऊन मायदेशी परतल्यावर गिरणगावात त्याच पद्धतीने त्यांनी काम सुरू केले. तसेच सोबतीला स्थानिक भागात त्यांनी शिक्षणाचे व आरोग्याचे महत्त्व व मुलांचे योग्य पालनपोषण या बाबतीत जाणीवजागृती केली. या भागात गिरणी कामगार स्त्रियांसाठी भारतात प्रथमच पाळणाघरे सुरू केली. ब्राह्मण कुटुंबातील प्रथा -परंपरा बाजूला ठेवीत, त्या अस्पृश्य समाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी धडपडू लागल्या.
१९१६ मध्ये लखनऊमध्ये काँग्रेसच्या एका कार्यक्रमामध्ये त्यांची गांधीजींशी गाठ पडली. गांधीजींनी बिहार चंपारण्यातील निळीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याच्या मागणीसाठीच्या सत्याग्रहासाठी त्यांच्याबरोबर अवंतिकाबाई यांनीही यावे अशी विनंती केली. आणि अवंतिकाबाईंनी आनंदाने चंपारण्याच्या सत्याग्रहामध्ये भाग घेण्यासाठी तयार झाल्या. प्रथमच महाराष्ट्राच्या सत्याग्रही तुकडीत आनंदी वैशंपायन व अवंतिकाबाई गोखले या दोन महिला होत्या. त्यादरम्यान बिहारमध्ये फिरून त्यांनी महिलांना आरोग्याचे धडे दिले. मुलींच्या शिक्षणाकरिता प्रचार केला. तेथील गावात मुलींची शाळा काढली. मुलींमध्ये लिहिणे, वाचणे व त्यांच्यामध्ये स्वदेशप्रेम निर्माण करण्याचे अवघड काम अवंतिकाबाईंनी केले. आणि याचबरोबर चंपारण्यात त्यांनी मराठी भाषेतले पहिले गांधींचे चरित्र लिहायला सुरुवात केली.
अनेक पुढारी, गांधी, टिळक यांच्यासमोर त्या भाषणं करीत. १९१९ मध्ये नाशिकमधल्या एका सभेत अवंतिकाबाईंचे प्रभावी भाषण ऐकून लोकमान्य टिळक प्रभावित झाले आणि ते उत्स्फूर्तपणे म्हणाले, ‘‘महाराष्ट्राची सरोजिनी आता तयार झाली आहे.’’ स्त्रियांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी त्यांना एकत्र आणून त्यांचा व्यक्तिविकास व सबलीकरण व्हावे यासाठी शिक्षण देणे महत्वाचे आहे, असे त्यांना वाटले. आणि त्यासाठी त्यांनी गिरगावात ‘हिंद महिला समाजा’ची स्थापना केली. या समाजाच्या त्या स्वत: ३१ वर्षे अध्यक्ष राहिल्या. त्यांनी या समाजात सूतकताईचे वर्ग देखील सुरू केले होते.
१९२३ मध्ये मुंबई महापालिकेमध्ये त्यांचा प्रवेश झाला. त्यांचा स्वच्छ कारभार फक्त लोकहिताचा विचार यामुळे त्या लोकप्रिय होत्या. मुंबई महानगरपालिकेने स्त्रियांना मताधिकार व निवडणुका लढविण्याचा अधिकार १९२२ मध्ये मान्य केला आणि त्या कायद्याप्रमाणे झालेल्या निवडणुकीत सरोजिनी नायडू, बच्चूबेन लोटवाला, हॅडगिव्हसन व अवंतिकाबाई अशा चार स्त्रिया निवडून आल्या. त्यात अवंतिकाबाईंना प्रचंड मते मिळाली. परंतु काही तांत्रिक कारणामुळे त्यांची निवड रध्द झाली. अवंतिकाबाई यांना असलेला प्रचंड पाठिंबा व त्यांचे सामाजिक कार्य लक्षात घेऊन त्यांना. १ एप्रिल १९२३ रोजी महानगरपालिकेत स्वीकृत सदस्यत्व मिळाले. त्या १९३१ पर्यंत सातत्याने त्यांना स्वीकृत सदस्य राहिल्या. १९२८ मध्ये त्यांचे नाव महापौरपदासाठी सुचविले गेले. दुसरे नाव होते मुंबईतील प्रसिध्द डॉ. गोपाळराव देशमुख यांचे. बाईंच्यामते, डॉक्टर हे उमेदवार म्हणून योग्य आहेत. त्यामुळे आपण या पदासाठी इच्छुक नसल्याचे सांगितले, नाही तर १९२८ मध्येच मुंबईला पहिली महिला महापौर मिळाली असती.
अशातच २६ ऑक्टोबर १९३० रोजी पोलीस कमिशनरचा हुकूम मोडून अवंतिकाबाईंनी मुंबईच्या आझाद मैदानावर झेंडावंदन साजरे केले. या वेळी मोठ्या संख्येने लोक जमले होते. पोलिसांनी मुली व बायकांवर जोरदार लाठीमार सुरू केला. घोडस्वार अंगावर घालणे. रात्रीच्या वेळी बायकांना पकडून जंगलात सोडून देणे. अशाप्रकारचा कार्यकर्त्यांना मनस्ताप देणे हे सरकार करीतच होते. त्यातच अवंतिकाबाईंना अटक झाली. तेंव्हा ‘मी एका पवित्र कार्यासाठी कारागृहात जात,’ त्यांची भावना होती. ह्या घडामोडी चालू असताना त्यांच्या पतीला बबनरावांना हृदयविकाराचा झटका आला. तेव्हा गांधीजींनी त्यांना स्पष्ट सांगितले की, आता फक्त पतीकडेच लक्ष द्यायचे, बाकी कामं इतरांवर सोपवा. बाईंनी आपल्या पतीची सेवा केली. परंतू त्यात स्वतः आजारी पडल्या. त्यांना स्वत:ला कर्करोगाचे निदान झाले नि त्यांची प्रकृतीत बिघाड वाढत चालला. ही बातमी कळताच गांधीजींनी त्यांना धीर देणारे पत्र लिहिले. हे पत्र शेवटचे ठरले! काहीच दिवसांत गांधींजीची हत्या झाली. याचा जबरदस्त धक्का अवंतिकाबाईंना बसला. त्या गांधीजींच्या आवडत्या आणि आदर्श शिष्या होत्या. त्या मनोमन आणि शरीराने देखील खचत चालल्या होत्या. गांधीजी आपल्याला बोलावत आहेत. पतीलाही त्या म्हणत असत – ‘चला, आता दोघंही बापूंकडे जाऊ या.’ असं म्हणत त्या एक दिवस हे जग सोडून गेल्या.