विदर्भातली ‘ही’ गायिका करणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश!
अकोला: महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार सत्ता स्थापनेनंतर अनेक पक्षप्रवेश पाहायला मिळत आहेत. सध्या चित्रपट विश्वातील अनेक कलाकार राजकीय क्षेत्रात उतरताना दिसत आहेत.काही दिवसांपूर्वीच प्रिया बेर्डे आणि मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. यानंतर आता मराठी चित्रपट विश्वातील प्रसिद्ध गायिका वैशाली माडे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. याबाबतची माहिती चित्रपट, कला, साहित्य, सांस्कृतिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे.
चित्रपट, कला, साहित्य, सांस्कृतिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की, लोकप्रिय गायिका वैशाली माडे यांचा ३१ मार्चला मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे बडे नेतेही उपस्थित राहणार असून दुपारी १२ वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे.
सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या आहेत. एका सर्वसामान्य घरातील मुलगी ते चित्रपट सृष्टीतील नामवंत गायिका हा वैशाली यांचा प्रवास अतिशय संघर्षाचा आहे. ‘झी’ वरील मराठी आणि हिंदी अशा दोन्ही स्पर्धांचं विजेतेपद पटकावल्यानं वैशाली यांचे महाराष्ट्रासह देशभरात चाहते आहेत. वैशाली यांच्या प्रवेशाच्या माध्यमातून विदर्भातील कलाकारांना पक्षाशी जोडण्याचा राष्ट्रवादीचा मानस असल्याची माहिती राष्ट्रवादीतील सूत्रांनी दिली आहे.
वैशाली माडेंनी गाणे गायलेले चित्रपट:
- इरादा पक्का (२०१०)
- दमादम्म (२०११)
- मध्यमवर्ग (२०१४)
- बाजीराव मस्तानी (२०१५)
- हंटर (२०१५)
- कॅरी ऑन (२०१५)
- अंग्रेजी में कहते है (२०१७)
- ३१ दिवस (२०१८)
- रणांगण (२०१८)
- आटपाडी नाईट्स (२०१९)
- कलंक (२०१९)
मराठी बिग बॅासमुळे वैशाली माडे चर्चेत
गायिका वैशाली माडे अलीकडेच मराठी बिग बॉसमुळे प्रचंड चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या बातमीमुळे पुन्हा चर्चेत आल्या आहेत. वैशाली माडे यांनी आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. तसेच विविध मराठी मालिकांच्या ‘टायटल साँग’लाही त्यांनी आपला आवाज दिला आहे. त्यांच्या आवाजातील टायटल साँग आजही अनेक दर्शकांच्या जीभेवर रेंगाळतात.