१ मे पासून सुरु होणाऱ्या १८ वर्षापुढील लसीकरणाचा ‘असा’ आहे राज्य सरकारचा प्लॅन

मोफत लस मिळणार का? आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती
मुंबई : महाराष्ट्राने आज दीड कोटी लसीकरण पूर्ण केले असून एवढ्या मोठ्यासंख्येने लसीकरण करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे. काल दिवसभरात ५ लाख ३४ हजार नागरिकांना लस देऊन राज्याने विक्रमी नोंद केली आहे. याविषयीची माहिती आज राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान १ मे पासून संपुर्ण देशासह राज्यात १८ वर्षावरील नागरिकांना लसीकरणास सुरुवात होणार आहे. याविषयी माहिती देताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यात किती जणांना लसीकरण केले जाणार आहे, किती खर्च लागणार आहे, यासाठी किती लस लागणार आहे याविषयी संपुर्ण माहिती दिली व महाराष्ट्र सरकारने या लसीकरणासाठी कोणती तयारी केली आहे हे सुध्दा सांगितले आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, ‘राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने आम्ही मंत्रीमंडळाला एक नोट तयार करुन पाठवली आहे. यामध्ये मोफत दिली तर किती खर्च, काही घटकांना मोफत दिली तर किती खर्च यासंदर्भातील वेगवेगळे पर्याय आणि आकडेवारी देण्यात आलीय,’ दरम्यान राज्यात किती लोकांना नवीन टप्प्यामध्ये लसीकरण करण्यात येणार याविषयी माहिती देताना ‘५ कोटी ७१ लाख लोकं हे या वयोगटातील आहेत. दोन लसींचे डोस द्यायचे असतील तर १२ कोटींच्या दरम्यान लसी लागणार आहेत. त्याचा खर्च साडेसात हजार कोटींच्या वर जाईल,’ असं आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत.
मोफत लस देण्याच्या संदर्भात माहिती देताना याबाबत मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याविषयी लवकरच मंत्रीमंळाची बैठक होणार असून मोफत लसीकरणाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहिर करतील त्यामुळे मोफत लस मिळणार की नाही यासाठी नागरिकांना आणखी थोडी वाट पहावी लागणार आहे. दरम्यान १ मे पासून १८ वर्षापासून नागरिकांना सुरु होणाऱ्या लसीकरणासाठी लस उपलब्ध करुन देण्याबाबत देशात तयार करण्यात येणाऱ्या लसनिर्मिती कंपन्या सोबत विचारणा केली आहे. मात्र या दोन्ही कंपन्यांकडून अद्याप उत्तर आलेले नाही असेही आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
‘आम्ही लस खरेदी करायला तयार आहोत. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर व्यास यांनी आम्ही कोव्हिशिल्डसाठी सीरमला आणि कोव्हॅक्सिनसाठी भारत बाॅयटेकला पत्र लिहिले आहेत मागील दोन दिवसांपासून काहीच रिप्लाय आलेला नाही. आम्ही स्पष्ट सांगितलं आहे आम्हाला १२ कोटी लसी हव्या आहेत. तुम्ही कशा देणार, किती रुपयांना देणार, आम्ही पैसे कसे देऊ त्याचं शेड्यूल कसं असणार अशी विचारणा राज्य सरकारकडून करण्यात आलीय. या मागणीचा अर्थच एवढाच की या पत्राच्या माध्यमातून आम्ही लसीकरणांसाठी कटीबद्ध आहोत हे दिसून येत आहे.’ पुढे बोलताना कोव्हिशिल्डबाबत २० मे नंतरच बोलावं असं आम्हाला सांगण्यात आले आहे. उत्पादन क्षमता आहे तितक्या लसी इतर ठिकाणी पुरवल्या जात असल्याचं आम्हाला सांगण्यात आलं आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्ट केलं आहे.