ही महाविकास आघाडी नसून महावसूली आघाडी-प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली: मुंबईत स्फोटकांनी भरलेली गाडी आढळल्या प्रकरणात सचिन वाझेला अटक करण्यात आली त्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी एक पत्र लिहून अनिल देशमुख यांनी १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचं म्हटलं अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. तर या संपूर्ण प्रकरणावरुन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
या पत्रकार परिषदेत प्रकाश जावडेकर यांनी शिवसेना आणि सचिन वाझे यांच्यात संबंंध काय आहे असा सवालही उपस्थित केला. यावेळी त्यांनी संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझे याच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या व्हिडिओ क्लिप्स सुद्धा प्ले करुन दाखवल्या.
“गेल्या ३० दिवसांमध्ये महाराष्ट्रात अशा उलथापालथी होत आहेत, रोज इतके नवनवे खुलासे होत आहेत की त्यांचा ट्रॅक ठेवणं देखील कठीण जात आहे. एक तर स्पष्ट झालं की ही महाविकास आघाडी नसून महावसूली आघाडी आहे. यांचा किमान समान कार्यक्रम म्हणजे पोलिसांकरवी पैसा गोळा करा, लुटा हाच यांचा एकमेव कार्यक्रम सुरू आहे. महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरं निघाली आहेत”, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे.
“दोन वर्षांपूर्वी वाझेला सेवेत घेतलं. फडणवीस म्हणाले ठाकरेंचा आग्रह होता म्हणून परमबीर सिंग यांनी त्यांना पुन्हा सेवेत घेतलं. जगात सगळं पाहिलं असेल, पण पोलीसच बॉम्ब ठेवतात हे कुणी पाहिलं नसेल. हेही मुंबईने पाहिलं. पोलीसच ज्याची गाडी चोरी झाली ती घेऊन जातात आणि त्यातच बॉम्ब ठेवतात. त्यानंतर ज्याची गाडी असते त्याची हत्या होते. हत्या कोणत्या हेतूने झाली हे तर आता समोर येईलच. नंतर मध्येच परमबीर सिंग यांचं पत्र येतं. एका न्यायाधीशांची समिती स्थापन होते. रश्मी शुक्लांचा अहवाल येतो. मग सीबीआयची चौकशी सुरू होते. अनिल देशमुखांचा राजीनामा येतो. एनआयएचा तपास सुरूच आहे. वाझेच्या गाड्या आणि पराक्रमातून रोज नवनवे खुलासे होतात. आणि आता वाझेचं पत्र आलंय”, असं प्रकाश जावडेकर यावेळी म्हणाले.
प्रकाश जावडेकर यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे –
- महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार हे खरं तर महावसुली सरकार
- हे मागच्या दाराने आलेलं सरकार आहे
- सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही
- उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा
- पोलीस यंत्रणेचा गैरवापर करण्यात आला
- आम्ही जगातील सर्व काही पाहिलं पण पोलीस बॉम्ब ठेवतात हे प्रथमच पाहिलं
- ज्या व्यक्तीची गाडी होती त्याची हत्या करण्यात आली
- दरम्यान परमबीर सिंग यांचे पत्र समोर येतं
- सचिन वाझे आणि शिवसेनेचे नाते काय? प्रकाश जावडेकरांनी उपस्थित केला प्रश्न
- पोलिसांकडून वसुली करा, लूट करा आणि वाटून घ्या… म्हणूनच तिन्ही पक्ष एकत्र आहेत