‘ही आजची प्रसन्न सकाळ आहे ‘, यशस्वी शस्त्रक्रियेनंतर सुप्रिया सुळेंचं ट्वीट
मुंबई: पोटदुखीचा त्रास होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोमवारी रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आलं होतं. पित्ताशयातील खडे हे त्यांच्या पोटदुखीचं कारण असल्याचं तपासणीतून पुढं आलं. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही शस्त्रक्रिया आज होणार होती. मात्र, मंगळवारी रात्री पुन्हा त्रास सुरू झाल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर एन्डोस्कोपीद्वारे त्यांच्या पित्ताशयातील खडे काढून टाकण्यात आले. त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्याची गरज असून ती कधी करायची याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, अशी माहिती डॉक्टर अमित मायदेव यांनी दिली.
शरद पवार यांच्या पित्ताशयावरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. पोटदुखीच्या त्रासामुळं त्यांना मंगळवारी रात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं काल रात्री उशिरा त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
सुप्रभात, ब्रीच कँडी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स,परिचारीका आणि सपोर्टिंग स्टाफ यांचे मनापासून आभार. ही आजची प्रसन्न सकाळ आहे आणि आदरणीय @PawarSpeaks साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम अर्थात वर्तमानपत्रांचं वाचन, करीत आहेत. pic.twitter.com/ERf0Gl35Tp
— Supriya Sule (@supriya_sule) March 31, 2021
शस्त्रक्रियेच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, आमदार रोहित पवार आदी रुग्णालयात उपस्थित होते. पवारांवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर सुप्रिया सुळे यांनी एक फोटो ट्वीट केला असून ब्रीच कँडी रुग्णालयाच्या डॉक्टरांचे आभार मानले आहेत. सुप्रिया सुळे यांनी ट्वीट केलेल्या फोटोत शरद पवार हे वर्तमानपत्रे वाचताना दिसत आहेत. ‘ही आजची प्रसन्न सकाळ आहे,’ असं सुळे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
Sharad Pawar ji is doing well after the operation. Stone has been removed from the Gallbladder successfully: Maharashtra Health Minister Rajesh Tope (30.03) pic.twitter.com/5p68FrEB7p
— ANI (@ANI) March 30, 2021
सध्या शरद पवार यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.