राज्यातील काँग्रेस आमदारांनी उचलले ‘हे’ मोठे पाऊल

मुंबई : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. ऑक्सिजन, रेमडेसीवीरची कमी जाणवत आहे. तर १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण करण्यात येत आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर ताण पडणार आहे. हे लक्षात घेवुन राज्यातील सर्व काँग्रेस आमदारांनी मोठा निर्णय घेतला असून एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माहिती दिली असून तसेच महाराष्ट्र काँग्रेस कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५ लाख रुपये देण्याची सुद्धा घोषणा त्यांनी यावेळी केली आहे. तसेच स्वतः बाळासाहेब थोरात यांनी आपले एक वर्षाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार असल्याचे सांगितले आहे.
बाळासाहेब थोरात यांच्या अमृत उद्योग समूह मध्ये अधिकारी, कर्मचारी असा पाच हजार सेवक वर्ग आहे. त्यांचा लसीकरण खर्च देखील मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कालच मनसे नेते व माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी माजी आमदार म्हणून मिळणारे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. सध्या राज्याचे उत्पन्न घटले आहे. त्यामुळे मला मिळणारे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देत असल्याचे म्हटले होते.
त्याच बरोबर बाळा नांदगावकर यांनी राज्यातील माजी- आजी आमदार – खासदार यांनी महाराष्ट्रातील सर्वच लोकाप्रतीनिधिनी आपले मानधन जे आपणास मिळते ते सामाजिक बांधिलकी म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला द्यावे. असे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे.