या दोन पाटलांनी कृष्णेच्या पात्रात उड्या घेवून इंग्रजांना तुरी दिलेल्या…

स्वातंत्र्यवीर सावरकर, ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी आयुष्याची राख रांगोळी केली. स्वतंत्र्य भारताचं स्वप्नं बघत इंग्रजांविरुद्ध त्यांनी लढा दिला. सावरकरांच्या आयुष्यातली सर्वात शौर्याची घटना मानली जाते ती म्हणजे, बोटीतून फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरामध्ये त्यांनी घेतलेली उडी.
ब्रिटिशांच्या ताब्यातून सुटका करून घेत आपल्या देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी आपला लढा चालू ठेवण्याच्या हेतूनं सावरकरांनी हे धाडस केलेलं.
आजही सावरकरांचा पराक्रमी इतिहास सांगताना बोटीतून मार्सेलिस बंदरामध्ये त्यांनी मारलेल्या ऊडीचा किस्सा आवर्जून सांगितला जातो. किंबहुना त्याविना सावरकरांच्या पराक्रमाच्या खुणा अधोरेखित करणं शक्य नसल्याचं बोललं जातं.
पण अशाच पराक्रमी उड्या महाराष्ट्रातील क्रांतिकारकांनी घेतलेल्या आहेत. त्या बद्दल तुम्हाला माहिती आहे का ?
प्रामुख्यानं या क्रांतिकारकांमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील, वसंतदाद पाटील यांचा समावेश आहे.
१. क्रांतिसिंह नाना पाटील
इंग्रज सरकारच्या काळात प्रतिसरकारचा प्रयोग यशस्वी करुन दाखविला तो नानांनी. इंग्रज शासनाला समांतर अशी शासन यंत्रणा उभी केली पाहिजे असा त्यांचा विचार होता. पुढे नानांनी यावर काम करून ‘आपुला आपण करू कारभार’ या सूत्रानुसार, त्यांनी प्रती सरकार अंमलात आणलं.तो काळ होता १९४२ चा.
यामुळे नान पाटील यांना इंग्रजांच्या मोठ्या रोषाला सामोरं जावं लागलं. इंग्रजांनी त्यांना पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. १९४२ ते १९४६ ते भूमिगत होते. पण नाना हाती लागले नाहीत.
पण यागोदर १९२० ते ४२ याकाळात ते ८ ते १० वेळा जेलमध्ये जाऊन आलेले. याचदरम्यान, नानांनी अटकेत असताना रेल्वेतून थेट कृष्णेच्या पात्रात उडी मारली होती.
२. वसंतदादा पाटील
हा काळ होता १९३० चा. यावेळी वसंतदादा अगदी लहान होते. तरीही या वयात असल्यापासूनच ते स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले. पुढे ४० च्या आसपास त्याचं काम जास्त जोमानं सुरु झालं. फोनच्या तारा तोडणं, पोस्ट जाळणं, रेल्वेचं नुकसान करणं, बाँबच्या मदतीनं इंग्रज पोलिसांमध्ये दहशत पसरवणे या कामात दादा पटाईत होते.
वसंत दादांनाही काही काळ भूमिगत राहावं लागलं होतं. पुढे त्यांना 3 वर्षे जेलमध्ये जावं लागलं. १९४३ मध्ये जेंव्हा दादांनी तुरुंगातून निसटण्याचा प्रयत्न केला होता. पण इंग्रज पोलिसांनी त्यांना खांद्याला गोळी मारून घायाळ केलं. त्यामुळे परत दादाना जेलमध्ये टाकलं गेलं.
इंग्रजांविरुद्ध लढत असताना वसंत दादांनीही पाण्यात उडी टाकून इंग्रजांना तुरु दिल्या होत्या. पाठीमागून सुरू असलेला इंग्रज पोलिसांचा गोळीबार चुकवत त्यांनी दुथडी भरून वाहणाऱ्या कृष्णा नदीत उडी मारली होती. यामुळे दादांचे दोन साथीदार शहीद झाले. पण दादांनी कृष्णेत उडी घेऊन जीव वाचवला.
तसं तर बतेच क्रांतिकारक आहेत, ज्यांनी जीवाची पर्वा न करता स्वातंत्र्य लढ्यात जान आणली. हे करत असताना त्यांना भूमिगत राहावं लागलं. इंग्रजांच्या गोळ्या चुकवाव्या लागल्या. अशाच महान क्रांतिकारकारकांचा इतिहास समोर आणण्याचा आमचा उद्देश राहील.
हे पण वाचा की
‘शरदच्या नेतृत्वाखालीच सरकार आलं पाहिजे.’ वसंतदादांचा आग्रह होता…
वसंत दादांचा पट्ठ्या राजकारणात ‘पाटील’की गाजवणार का ?
तावडेंचे प्रमोशन, मुंडेंची खदखद कायम ; पाटील म्हणतायत खूप स्कोप आहे…