येत्या काही दिवसांत हे लोक पूर्णपणे उघड पडणार
मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर एका गाडीमध्ये स्फोटके सापडल्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने महाराष्ट्र पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची या पदावरून हकालपट्टी केली. त्यानंतर परमबीर सिंह यांनी एका पत्राद्वारे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कोट्यवधी रुपये गोळा करण्याचे आदेश वाझे यांना दिल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. असं असतानाचं कंगनाने या प्रकरणात उडी घेतली आहे.
कायम वादाचा मुकूट डोक्यावर मिरवणारी अभिनेत्री कंगना रानौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने आता थेट राजकारणावर प्रश्न उपस्थित केला आहे. कंगना कायम चालू घडामोडींवर आपलं मत सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत, वादाच्या भोवऱ्यात राहते. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर कंगनाने संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीबरोबरच महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांवर आरोप केला होता. हा आरोप करताना मुंबई शहराची तुलना पाकव्याप्त काश्मिरसोबत केली आणि मुंबई पोलिसांची तुलना अतिरेक्यांशी केली होती. यावरून सत्तारुढ शिवसेना आणि कंगना यांच्यात पराकोटीचे वाद झाले होते.आता पुन्हा एकदा कंगनाने महाराष्ट्र सरकारवर कडाडून टीका केली आहे.
यावेळी कंगनाने महाराष्ट्रातील व्यवस्थेवर निशाणा साधला आहे. कंगना ट्विट करत म्हणाली, ‘मी जेव्हा भ्रष्टाचार आणि महाराष्ट्र सरकारच्या भ्रष्ट कारभाराबाबत आवाज उठवला तेव्हा तेव्हा मला धमक्या देण्यात आल्या. माझ्यावर टीका करण्यात आली. पण मी सगळ्या गोष्टींचं उत्तर दिलं.’ असं कंगना म्हणाली. शिवाय माझ्या आवडत्या शहराबद्दल माझ्या निष्ठेबद्दल माझ्यावर बोट ठेवण्यात आलं. तेव्हा देखील मी गप्प राहिले. माझं घर तोडण्यात आलं तेव्हा अनेकांनी आनंद साजरा केला. असं ट्विट करत तिने महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे.
When I called out corruption and ill administration of Maharashtra government I faced so much abuses,threats,criticism I retaliated but when my loyality for my beloved city was questioned I cried silently.When they illegally demolished my house many cheered and celebrated (cont) https://t.co/TbdnNaXUSU
— Kangana Ranaut (@KanganaTeam) March 20, 2021
कंगना तिच्या दुस-या ट्विटमध्ये म्हणते, ‘ येत्या काही दिवसांत हे लोक पूर्णपणे उघड पडणार आहेत. मी खंबीरपणे यांच्याविरोधात उभी आहे कारण माझ्या अंगात शूरवीर राजपूतांचे रक्त आहे. या राजपूत रक्तामध्ये देशाबद्दल खरे प्रेम असते, हे माझ्यात आणि माझ्या कुटुंबात आहे. मी हरामखोर नाही तर, खरी देशभक्त आहे.’ राजकीय घडामोडींवर कंगना नेहमी तिच्या अंदाजात काही ना काही तरी खळबळजनक भाष्य नेहमीच करत असते. महाराष्ट्र सरकारवर पुन्हा एकदा टीका करत तिने आता या वादात उडी घेतली आहे.