प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला पोहणाऱ्या जोतिबांवर ‘या’ व्यक्तींचा होता प्रभाव..

Jyotiba Phule
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

“प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते.” असे म्हणणाऱ्या ज्योतीबांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.  “नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे.” त्यांनी म्हणल्याप्रमाणे त्यांचे विचार, संकल्पना त्यांनी सत्यात उतरवल्या. अनेक प्रगल्भ मते, विचार त्यांनी मांडले असून आजही या विचारांचा सन्मान करून ते आचरणात आणल्यास अनेक गोष्टींनी काळाबरोबर आपण परिपक्व होऊ शकतो. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी या विचारांचा नक्की फायदा होईल आणि उंच शिखर गाठणं सोपं होईल. जोतिबांनी त्यांच्या कार्याने आणि विचारांनी जो आपल्यावर जबरदस्त प्रभाव पडला आहे त्या महानमूर्ती वर कुणाचा प्रभाव असेल हा प्रश्न नेहेमीच मला पडायचा… त्याचं उत्तर तर मिळालं की, जोतिबा यांचे मतपरिवर्तन करणाऱ्या अशा कोणत्या घटना/व्यक्ती/चरित्र असतील…  त्याबद्दल आज आपण बोलू…

१८४३ मध्ये जोतिबांचे स्कॉटिश मिशनरी शाळेतील मित्र सदाशिव बल्लाळ गोवंडे यांचे लग्न होते. या लग्नाच्या वरातीत एका माळ्याचा मुलगा ब्राह्मणांसोबत चालत आहे हे पाहून ब्राह्मणांनी त्यांचा अपमान केला. या घटनेचा त्यांच्या मनावर मोठा आघात झाला. ब्राह्मण लोक शूद्रांना इतक्या हीन प्रकारची वागणूक देतात याचा प्रथमच अनुभव ज्योतिरावांना आला आणि त्यातूनच त्यांच्या सार्वजनिक कार्याचा जन्म झाला.

शैक्षणिक क्रांतीची प्रेरणा:

जोतिरावांच्या शैक्षणिक क्रांती मागे नगरच्या ख्रिस्ती मिशनरी मि. फरारबाई यांचा मोठा वाटा आहे. ज्योतिराव व त्यांचे मित्र सदाशिव गोवंडे नगरला मिसेस फरारबाईंची मुलींची शाळा पाहायला गेले होते. फरारबाई एतद्देशीय मुलींसाठी करत असलेल्या शैक्षणिक कार्याचा प्रभाव ज्योतीरावांवर पडला. त्यातूनच एक थोर शिक्षण महर्षी यांचा जन्म झाला.

सगुणाबाई क्षीरसागर यांची प्रेरणा:

बालपणी आईच्या मृत्यूनंतर छोट्या ज्योतिबाचा सांभाळ करण्यासाठी गोविंदरावांनी आपल्या मानलेल्या बहिणीला बोलावले. त्या जॉन नावाच्या ख्रिस्ती मिशनऱ्याकडे मुले सांभाळण्याचे काम करीत होत्या. त्यामुळे छोट्या जोतिबाला ही त्या तिकडे घेऊन जात असत. सगुणाबाई मुळे जोतिबांना मिशनरी यांचा सहवास लाभला. त्यांच्या मुलांबरोबर राहायला मिळाले. “आपल्या ज्योतीबाने ख्रिस्ती फादर सारखे व्हावे आणि त्यांच्या हातून गोरगरीब व महार मांग यांची सेवा व्हावी”, अशा प्रकारची अपेक्षा सगुणाबाईंना होती. या परोपकारी वृत्तीच्या संस्कारांनी ज्योतिरावांचे व्यक्तिमत्त्व अधिकच समृद्ध झाले.

येशू ख्रिस्ताचा प्रभाव:

येशू ख्रिस्ताचा एक व्यक्ती म्हणूनही ज्योतीरावांवर प्रभाव होता. ज्योतिराव त्यांच्या ग्रंथात वारंवार येशू आणि त्याच्या शिकवणुकीचा उल्लेख करतात. सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकात ज्योतिराव येशू ख्रिस्ताचा उल्लेख ‘यशवंत’ असा करून त्याबद्दल गौरद्गार काढतात.

पाश्चात्य विचारवंतांचा प्रभाव:

१९ व्या शतकात महाराष्ट्रातील अनेक समाजसुधारकांवर ख्रिस्ती धर्माचा प्रभाव होता. ते सर्व ‘थेईस्ट’ विचार मानणारे होते. ज्योतिराव मात्र ‘डेईस्ट’ विचारसरणीने प्रभावित झालेले होते. ‘थेईस्टांची’ ईश्वर कल्पना बायबलवर आधारित होती. थेईस्टांचा गट चमत्कार, कल्पना या गोष्टींवर विश्वास ठेवणारा होता. या उलट डेईस्ट गट धर्मग्रंथ न मानता, बुद्धिप्रामाण्यवादावर विश्वास ठेवणारा गट होता. अमेरिकन प्रसिद्ध विचारवंत व थॉमस पेन हे विचारधारेच्या प्रमुखांपैकी एक होते. थॉमस पेन यांच्या ग्रंथांचा परिचय झाल्यामुळेच फुले यांना ख्रिस्ती धर्माची थेईस्ट बाजू लक्षात आली. पेन यांच्या विचाराने ते इतके प्रभावित झाले की, ‘Edge of Region’, ‘Rights of Man’ या दोन ग्रंथांचे पारायणे त्यांनी आपले मित्र वाळवेकर व नवरंगे यांच्या साहाय्याने पूर्ण केली होती. अमेरिकन व फ्रेंच राज्यक्रांती भाग घेणारा पेन हा स्वतःच्या मनालाच ‘धर्मशासन’ मानणारा होता. याचा प्रभाव सत्यशोधक समाजनिर्मितीत दिसून येतो. तसेच ‘सार्वजनिक सत्यधर्म’ मधील 33 वचने पेनच्या धर्मनिरपेक्षतेच्या सूत्रांवर आधारित आहेत.

संत तुकारामांचा प्रभाव:

जोतिरावांनी संत तुकारामांस ‘शेतकऱ्यांचा संत’ मानलेला आहे. मात्र जगद्गुरू संत तुकारामांचा शिवाजी महाराजांसोबत स्नेह वाढू न दिल्याबद्दल ते रामदास स्वामींवर व गागाभट्टांवर टीका करतात. ज्योतिबा त्यांचे मित्र तुकाराम हनुमंत पिंजण यांच्याबरोबर सतत देहूला जात असत. यामुळे त्यांचा तुकोबारायांचा अभंगाशी योग्य परिचय झाला होता. याचबरोबर त्यांचे मित्र गंगाराम भाऊ मस्के यांच्या मुलाला तुकारामांच्या वंशजांची मुलगी दिली होती. त्यामुळे फुले यापासून ते सत्यशोधक समाजातील कार्यकर्त्यांचादेखील यामुळे देहूशी संबंध आला. या सर्व गोष्टींचा उपयोग जोतीरावांनी समाजप्रबोधनासाठी केला.

वज्रसुची चा प्रभाव:

‘वज्रसुची’ हा बौद्ध तत्त्वज्ञ अश्वघोष लिखित संस्कृत ग्रंथ असून याचा, मराठी अभंगानुवाद संत तुकारामांच्या परमशिष्या बहिणाबाई यांनी केला होता. ब्राह्मणत्व कशाने सिद्ध होते या ग्रंथात सांगितले आहे. ‘जीव, देह, जाती, ज्ञान, कर्म व धार्मिकता यापैकी कशानेच ब्राह्मणत्व सिद्ध होत नाही. तर केवळ आत्मसाक्षात्कारानेच ब्राह्मणत्व सिद्ध होते’. हा विचार या ग्रंथात तर्कशुद्ध रीतीने मांडला आहे. जन्मजात ब्राह्मण्यावर वज्रसूचीने आघात केला आहे. खरा ब्राह्मण कोणाला म्हणावे? या प्रश्नाचे उत्तर बहिणाबाई यांना या ग्रंथातून मिळाले म्हणूनच,  “तुकोबासारख्या परमानुभूतीने रंगलेल्या महामानवाला शूद्र म्हणून दूर लोटायचे आणि आपण केवळ जन्माने ब्राह्मण आहोत म्हणून त्यांच्या पुढे नमायचे नाही हे योग्य आहे का? अशा वैचारिक संघर्षाच्या काळात वज्रसूचीने निश्चयाचे बळ बहिणाबाईस दिले व त्यांनी जगद्गुरु तुकोबांचे शिष्यत्व पत्करले. या सर्व गोष्टींचा प्रभाव ज्योतिबावर पडला. त्यामुळे त्यांनी गुलामगिरी ग्रंथातून ब्राह्मणत्वांवर टीका केली. मनुस्मृतितील लबाडी उघडकीस आणली.

विप्रमतीचा प्रभाव:

कबीरांच्या बिजक ग्रंथातील विप्रमती छत्तीस ओळींचे काव्य ब्राह्मणांच्या मतीविरुद्ध असल्याने त्याला विप्रमती हे नाव पडले. कारण त्यामध्ये ब्राह्मणांच्या स्वार्थाच्या स्वभावाचे वर्तणूक वगैरेचे फार वर्णन आले आहे. ब्राह्मणांचे हे गुण ज्योतिरावांनी समाजामध्ये अनुभवले होते. परंतु या ग्रंथपरिचय यामुळे फुले यांच्या विचाराला मांडणीला अधिक धार आली. म्हणून फुले यांनी शूद्रातिशूद्रांना न्याय मिळवून देण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या कबीरांच्या बीजक ग्रंथाचे भाषांतर  अनंत गिरी महाराज मठाचे अधिपती ज्ञान गिरी बुवा यांनी ज्योतिरावांना करून दिले होते. या विप्रमतीच्या प्रभावाने त्यांनी मूर्ती पूजा वेदाअध्याय, तीर्थयात्रा, व्रतवैकल्ये, स्पृश्यास्पृश्यता इ. विविध मुद्द्यांवर ‘सत्यशोधक समाजीस्ट’ म्हणून टीका केल्या आहेत.

लोकपरंपरांचा प्रभाव:

महाराष्ट्रात खंडोबा देवाच्या पूजेच्या वेळी बेलभंडार उधळण्याची फार पूर्वीपासून पद्धत आहे. हीच परंपरा पुढे चालू ठेवताना फुले यांनी सत्यशोधक समाजाचे सभासद होताना बेलभंडारा उधळण्याची परंपरा कायम ठेवली.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *