वरिष्ठांविरोधात दाद मागता यावी यासाठी पारदर्शी व्यवस्था असायला हवी- खासदार सुप्रिया सुळे
यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिणार
पुणे: वरिष्ठ अधिकाऱ्यान विरोधात जर काही तक्रार करायची असल्यास पारदर्शक, गुप्त अशी व्यवस्था राज्यात असायला हवी. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र महिला अधिकारी दिपाली चव्हाण यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून गुरुवारी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. याबद्दल बोलतांना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, दिपाली चव्हाण सारखी महिला अधिकारी आत्महत्या करते तेव्हा अत्यंत वेदना होतात. अशी घटना भविष्यात घडू नये यासाठी काय करता येईल हा प्रश्न मला नेहमी पडत असतो.
फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून खासदार सुप्रिया सुळे यांनी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, एखाद्या ज्युनियरला त्रास देत असेल तर त्याने कुठे दाद मागावी याची व्यवस्था राज्यात असायला हवी. त्यामुळे त्या संबधित अधिकाऱ्याला न्याय मिळेल. त्याची माहिती गुप्त राहायला हवी आणि यासाठी वेळमर्यादा असायला हवी. संबधित अधिकाऱ्याने जर तक्रार केली तर त्याची सोडवणूक वेळेत व्हायला हवी. त्यावर लवकरात लवकर कारवाई अथवा पारदर्शकपणे चौकशी व्हायला हवी. त्रास झालेल्यांना मनमोकळ करू करायला एक जागा असायला हवी अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी यावेळी वक्त केली. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविणार असल्याचे सुळे यांनी सांगितले.
दिपाली यांनी का आत्महत्या केली याची चौकशी सरकार करणारच आहे. महाराष्ट्रातील प्रशासन हे भारतातील सर्वात चांगले प्रशासन समजले जाते. अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांना महाराष्ट्र केडरला काम करायची इच्छा असते. दिपाली चव्हाण सारखी अधिकारी आत्महत्या करते तेव्हा अत्यंत वेदना होत असल्याचे सुळे यांनी सांगितले.
महाराष्ट्रात अशा घटना घडत असेल तर आपण त्यात काय बदल करायला पाहिजे असा प्रश्न मला नेहमी पडत असतो. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहणार आहे. त्यांनी यासाठी एक चांगली पारदर्शक व्यवस्था आणावी. जी पूर्णपणे गुप्त असायला हवी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आत्महत्या हा उपाय नाही
मानसिक आरोग्याकडे आपण जास्त लक्ष देत नाही. सध्या आत्महत्या वाढल्या आहे. हा राजकीय विषय नसून सामाजिक विषय आहे. याचे चिंतन आपण करायला हवे. कामावरून गेल्या नंतर इतर विचार करायला हवे. ज्यातून आनंद आणि समाधान वाटेल ही गोष्ट करायला हवी. आत्महत्या हा मार्ग नव्हे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अतिशय संवेदनशील आहेत. दिपाली चव्हाण यांना न्याय देतील.