Friday, October 7, 2022
Homeब-बातम्यांचापुण्यात तूर्तास लॉकडाऊन नाही पण ...

पुण्यात तूर्तास लॉकडाऊन नाही पण …

पुणे : पुणे शहरात १ ते १४ एप्रिल या कालावधीत लॉकडाउन करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून देण्यात आला आहे. या प्रस्तावावर पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कौन्सिल हॉल येथे आयोजित बैठकीत चर्चा झाली. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी लॉकडाउन करण्यास विरोध दर्शवला. लॉकडाउन केलेल्या शहरांमध्ये रुग्णसंख्या नियंत्रणात आलेली नसल्याचा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळं लॉकडाउन नको, असं मत त्यांनी मांडलं. तर, आता लॉकडाऊन जाहीर करण्याऐवजी १ एप्रिलला पुन्हा बैठक घेऊन आढावा घ्यावा, अशी सूचना जिल्ह्याधिकारी राजेश देशमुख यांनी केली.

चर्चेअंती अजित पवार यांनी सध्या लॉकडाऊन न घेण्याचा निर्णय जाहीर केला.’पुण्यात सध्या लॉकडाऊन करण्यात येणार नाही, पण नियमांची अंमलबजावणी कठोरपणे केली जाईल. परिस्थिती नियंत्रणात न आल्यास एप्रिलमध्ये लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल,’ असा इशारा त्यांनी दिलाय. ‘जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था करा. ग्रामीण भागातील रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी ॲम्बुलन्सची व्यवस्था करा. गरज भासल्यास मनुष्यबळ वाढवा. खासगी रुग्णालयांमध्ये ५० टक्के बेड्स राखीव करा. जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था करा,’ अशा सूचनाही अजित पवार यांनी यावेळी प्रशासनाला केल्या.

जम्बो हॉस्पिटलमध्ये टप्प्याटप्प्याने सुविधा वाढवणार

पुण्यातील जम्बो हॉस्पिटलमध्ये टप्प्याटप्प्याने सुविधा वाढवणार आहे. तसेच पिंपरीचे जम्बो हॉस्पिटल १ एप्रिलपासून सुरु करणार आहोत. पुण्यातील ससून रुग्णालयातील ५०० बेड्सची व्यवस्था करणार आहे, असेही अजित पवारांनी सांगितले.

आजच्या बैठकीतले ठळक मुद्दे –

– १ एप्रिलपासून सर्व लोकप्रतिनिधींनी खासगी कार्यक्रम पूर्णपणे बंद

– शाळा-महाविद्यालयं ३० एप्रिलपर्यंत बंद राहतील.

– मॉल, चित्रपटगृहांसाठी ५० टक्के उपस्थितीचा नियम

– हॉटेलबाबत कोणताही बदल नाही. ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार. रुग्णांची संख्या आणखी वाढल्यास हाॅटेल बंद करावी लागतील

– लोकप्रतिनिधींनी राजकीय कार्यक्रम घेऊ नये

– संचारबंदीच्या वेळेत कोणताही बदल नाही. रात्री ११ ते सकाळी ६ ही वेळ कायम

– सार्वजनिक बस वाहतूक सुरू

– लग्न समारंभात ५० लोकांची उपस्थिती

– अंत्यविधीसाठी २० लोकांचीच परवानगी

– सार्वजनिक उद्याने, बागबगीचे फक्त सकाळीच सुरू

– शाळा आणि महाविद्यालये ३० एप्रिलपर्यंत बंद. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरल्याप्रमाणे होतील

– एमपीएससीच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार होतील

– लसीकरण केंद्र वाढविण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे मागणी केलीय. लवकरच ३१६ वरून ६०० केंद्र होतील.

– होळी सार्वजनिक पद्धतीने साजरी करू नये

पुण्यातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. पण ही परिस्थिती अशीच राहिली तर येत्या २ एप्रिलला निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. लॉकडाऊन केला तर गोरगरीबांचा रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण होतो. तो होऊ द्यायचा नाही म्हणून नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळणे आवश्यक आहे, असे आवाहन देखील अजित पवार यांनी या वेळी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments